धाराशिव: परंडा येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी केलेल्या स्फोटक विधानांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. परंडा नगरपरिषदेसाठी ‘एकला चलो’ ची घोषणा करत त्यांनी भाजप आमदार राणा पाटील यांच्यासोबतचे मतभेद तर उघड केलेच, पण त्याचबरोबर थेट महायुती सरकारलाच इशारा दिला आहे.
“२०२२ ला असं काही घडेल वाटलं होतं, घडलं! आणि आता का घडू शकत नाही? काय अडचण आहे?” असा थेट सवाल करत सावंत यांनी नव्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत. मंत्रीपद गेल्यापासून नाराज असलेल्या सावंतांनी जिल्हा नियोजन समितीच्या मागील तीन बैठकांनाही दांडी मारली होती. आता त्यांनी थेट सरकारलाच आव्हान दिल्याने महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
‘विकासाची दिशा चुकल्यास आव्हान देणार’
केवळ परंड्यापुरते मर्यादित न राहता सावंत यांनी थेट सरकारच्या धोरणांवर बोट ठेवले. ते म्हणाले, “मतदारसंघाच्या विकासाची दिशा चुकल्यास तानाजी सावंत सरकारसमोर आव्हान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.”
राजकारणातील गूढतेवर भाष्य करताना त्यांनी सूचक टिप्पणी केली. “अंडर करंट वेगळे असतात, जे चाललंय ते वेगळं असतं, वास्तव वेगळं असतं, आणि जे होत असतं ते तिसरंच होत असतं,” असे ते म्हणाले.
‘२ काय आणि २३४ काय, सगळी माणसंच’
सरकारच्या बहुमतावरही त्यांनी मार्मिक भाष्य केले. “यांच्याकडे २३४ आमदार आहे म्हणतात, २ काय अणि २३४ काय, अर्थ एकच आहे. माणसंच आहेत की सगळे, चिंता करायचं कारण नाही,” असे म्हणत त्यांनी आकड्यांच्या खेळाला महत्त्व देण्यास नकार दिला.
२०२२ च्या बंडाची आठवण
सावंत यांच्या या विधानांना २०२२ च्या सत्तांतराची पार्श्वभूमी आहे. “२०२२ च्या सत्तांतरासाठी आपण दीडशे बैठका घेतल्या होत्या,” असे विधान खुद्द तानाजी सावंत यांनीच यापूर्वी केले होते. त्यामुळे त्यांच्या या ताज्या इशाऱ्याने महायुतीत मोठी अस्वस्थता पसरली आहे.
एकीकडे भाजप आमदार राणा पाटील हे मुंबईत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक घेऊन महायुती एकसंध असल्याचा दावा करत असतानाच, दुसरीकडे सावंत यांनी स्वबळाचा नारा देत थेट सरकारलाच आव्हान दिल्याने धाराशिव जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.





