थांबवा! थांबा! ही राजकीय बातमी नाही, ही तर एका ‘महा’विनोदी सर्कसची पटकथा आहे. नाव: “धाराशिवची महायुती सर्कस: आम्ही करतो युती, पण आमची वेगळी मती!”
पार्श्वभूमी: धाराशिव जिल्ह्यात ८ नगरपालिकांचा ‘इलेक्शन फिव्हर’ चढला आहे. बिगुल वाजलाय. १० तारखेपासून फॉर्म भरणे, २ तारखेला मतदान, ३ ला निकाल. सगळा माहोल ‘टाईट’ आहे.
अंक पहिला: सर्कसचा ‘महा’ गोंधळ
सर्कसचं नाव आहे ‘महायुती’. पण हिच्यातले सगळे ‘खेळाडू’ एकमेकांचेच ‘खेळ’ करण्यात व्यस्त आहेत.
प्रमुख पात्र:
- प्रा. तानाजी उर्फ ‘काठावर पास’ सावंत : भूम-परंड्याचे आमदार. मागच्या वेळी फक्त १५०९ मतांनी ‘रिझल्ट’ लागला. मंत्रीपद गेलंय, त्यामुळे सध्या भलतेच नाराज आहेत. ‘एकला चलो रे’ हा त्यांचा सध्याचा आवडता सूर आहे.
- ‘पहेलवान’ राहुल मोटे: सावंताचे कट्टर ‘दोस्त-कम-दुश्मन’. आधी (शरद पवार गटात) सावंताच्या विरोधात होते, आता (अजित पवार गटात) सावंताच्या बरोबर आहेत. पण दोघेही एकाच ‘महायुती’ नावाच्या बोटीत बसून एकमेकांच्या दिशेने वल्हवत आहेत.
- ‘मॅनेजर’ प्रताप सरनाईक: पालकमंत्री. सगळ्यांना ‘युती’ नावाच्या एकाच दोरीने बांधायचा निष्फळ प्रयत्न करत आहेत. “अहो शांत व्हा, सगळं ‘ऑल वेल’ आहे” असं मुंबईत बसून सांगत आहेत.
- ‘पार्टनर’ राणा पाटील (भाजप): सावंताच्या ‘एकला चलो’चा पहिला बळी.
अंक दुसरा: ‘सावंताची स्फोटक बॅटिंग
इकडे ‘मॅनेजर’ सरनाईक मुंबईत भाजपवाल्यांसोबत (राणा पाटलांसकट) युतीच्या मिटींगा घेत आहेत. मिटींग संपल्यावर पत्रकारांना सांगतात, “अजिबात काळजी करू नका. आमची युती फेविकॉलपेक्षा मजबूत आहे.”
…आणि त्याच क्षणी, इकडे परंड्यात प्रा. तानाजी सावंत माईक हातात घेतात.
सावंत (कार्यकर्त्यांना): “ऐका! परंड्यात आपण ‘एकला चलो रे’!”
कार्यकर्ते: “पण साहेब, वरून युतीचा निरोप…”
सावंत (माईकवर): “अरे कोण वर? विकासाची दिशा चुकली तर तानाजी सावंत सरकारसमोर आव्हान उभं करील! आणि ऐका… २०२२ ला जे घडलं (शिंदे गट), ते वाटलं होतं का कुणाला? घडलं ना! मग आता का घडू शकत नाही? काय अडचण आहे?”
(सगळ्या पत्रकारांचे कॅमेरे ‘ऑन’. ‘मॅनेजर’ सरनाईकांना मुंबईत घाम फुटतो.)
सावंत (फॉर्ममध्ये): “आणि ते म्हणतात त्यांच्याकडे २३४ आमदार आहेत. अरे, २ काय आणि २३४ काय… सगळी माणसंच आहेत की! चिंता करायचं कारण नाही.” (डोळा मारत).
याचा छुपा अर्थ: “माणसं आहेत, कधीही गुवाहाटीला ‘सहल’ ला जाऊ शकतात. मी स्वतः दीडशे मिटींगा घेतल्या होत्या तेव्हा!”
अंक तिसरा: ‘पहेलवान’ मोटेचा ‘सायलेंट’ मोड
या सगळ्या गोंधळात सगळ्यात जास्त मजा ‘पहेलवान’ राहुल मोटे यांची झाली आहे. ते बिचारे तानाजी सावंत पासून वाचण्यासाठी एका गटातून दुसऱ्या गटात (अजितदादांकडे) आले. येऊन बघतात तर काय, तानाजीभाऊ त्याच ‘महायुती’ तळावर बसून स्वतःच्याच तंबूला आग लावायची तयारी करत आहेत.
भूममध्ये मोटेनी भाजपशी जुळवून घेतलंय, पण परंड्यात तानाजींनी वेगळी ‘चूल’ मांडलीय. म्हणजे एकाच घरात एक भाऊ बिर्याणी बनवतोय (युती), दुसरा भाऊ म्हणतोय, “मी नाही खाणार, मी माझी वेगळी खिचडी (एकला चलो) बनवणार.”
अंक चौथा: DPC बैठकीचा ‘बॉयकॉट’
प्रा. तानाजी फक्त बोलून थांबले नाहीत. मंत्रीपद गेल्याचा राग इतका आहे की, मागच्या तीन जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) बैठकांना ‘दांडी’.
मॅनेजर सरनाईक (फोनवर): “अहो तानाजी, DPC मिटींगला का नाही आलात? जिल्ह्याचा विकास…”
तानाजी सावंत (तिकडून): “विकासाची ‘दिशा’ चुकली आहे. माझा ‘अंडर करंट’ वेगळा आहे. जे दिसतं, ते नसतं. जे होतं, ते तिसरंच असतं. फोन ठेवतो. परंड्यात प्रचार करायचाय.” (फोन कट)
क्लायमॅक्स: (३ डिसेंबर – मतमोजणी)
धाराशिव जिल्ह्यातील मतदार २ डिसेंबरला मतदान करतील. ३ तारखेला निकाल लागेल.
पण खरा निकाल काहीही लागो, ‘महायुती’ सर्कसचा हा ‘कॉमेडी शो’ मात्र हिट झाला आहे. मतदार विचार करत आहेत की, “यांचं आपापसातच इतकं ‘जुळलंय’, तर हे आपलं काय ‘जुळवणार’?”
तात्पर्य: राजकारणात ‘युती’ म्हणजे लग्न असतं, पण इथे ‘महायुती’ म्हणजे ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ झाली आहे… ती पण ‘वर्क फ्रॉम होम’ वाली… जो तो आपापल्या घरात बसून ‘एकला चलो’ म्हणतोय!
– बोरूबहाद्दर






