धाराशिव: प्रेमसंबंधातून महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याप्रकरणी आरोपी विष्णू लक्ष्मण लोंढे यास १० वर्षे शिक्षा आणि ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. धाराशिवच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती. ए. डी. देव यांनी आज, दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी हा निकाल दिला. या प्रकरणात मयत मोहिनी समाधान चोपडे हिचा मृत्यू झाला होता.
प्रकरणाची अधिक माहिती अशी की, आरोपी विष्णू लोंढे आणि मयत महिला मोहिनी चोपडे यांची किराणा दुकानातील ओळखीमधून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघेही फोनद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. दिनांक १० ऑगस्ट २०१७ रोजी, मयत महिला घरी एकटीच असताना आरोपी तिच्या घरात आला. त्याने महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली असता तिने त्यास विरोध केला. यावरून चिडलेल्या आरोपीने घरातीलच प्लास्टिकच्या बाटलीतील रॉकेल तिच्या अंगावर ओतले आणि काडीपेटीने तिला पेटवून दिले. “जर कोणाला काही सांगितलेस, तर तुझ्या नवऱ्यावर अॅट्रॉसिटी दाखल करेन,” अशी धमकी देऊन आरोपी निघून गेला.
या घटनेत गंभीर भाजलेल्या पीडितेला उपचारासाठी शासकीय रुग्णालय, धाराशिव येथे दाखल करण्यात आले, जिथे १५ ऑगस्ट २०१७ रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
धमकीमुळे बदलला होता जबाब
सुरुवातीला, आरोपीने दिलेल्या धमकीमुळे भयभीत झालेल्या पीडित महिलेने मृत्यूपूर्व जबाबात वेगळीच माहिती दिली. बांधकामावर पाणी मारत असताना फ्युजवर पाणी पडून ठिणग्या उडाल्या व डिझेलच्या बाटलीवर पडून भडका उडाल्याचे तिने सांगितले. मात्र, नंतर उपचारादरम्यान पतीने विचारणा केली असता, तिने घडलेली खरी हकीकत सांगितली. आरोपीनेच रॉकेल ओतून पेटवून दिल्याचे स्पष्ट केल्यानंतर, मयताच्या पतीच्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२, ४५२, ५०६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. तपासात असेही निष्पन्न झाले की, मयताला पेटवून दिल्यानंतर आरोपीच्या कपड्यांनाही आग लागून तो किरकोळ भाजला होता.
११ साक्षीदारांची साक्ष
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एल. दराडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेंद्र बी. देशमुख यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. ॲड. देशमुख यांनी केलेला युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी विष्णू लोंढे यास कलम ३०४ (ii) अन्वये दोषी ठरवत १० वर्षे शिक्षा व ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.






