धाराशिव : एका महिलेवर बलात्कार करून, तिला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या आरोपीस धाराशिव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने १० वर्षांची सक्तमजुरी आणि १७,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुरज बाबु लातुरे पठाण (रा. पठाण) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, पीडित महिलेने तुळजापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती. दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पीडितेच्या मैत्रिणीने तिला नवीन कामाच्या ठिकाणी नेण्याचे सांगून पाटोदा येथे नेले. तेथे त्यांनी मुदतशीर शेख नावाच्या व्यक्तीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. सायंकाळी ७ वाजता संपर्क झाल्यानंतर मुदतशीर शेख आणि आरोपी सुरज पठाण हे दोघे आले.
रात्री साडेअकराच्या सुमारास पीडिता आरोपी सुरज पठाणच्या मोटार सायकलवर तर तिची मैत्रीण मुदतशीर शेखच्या मोटार सायकलवर बसून तुळजापूरकडे निघाले. यावेळी आरोपी सुरजने मुद्दाम गाडी हळू चालवल्यामुळे दुसरी गाडी पुढे निघून गेली. रस्त्यात वडगाव पाटी येथील खडी मशीनजवळ आरोपीने गाडी थांबवून पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केली.पीडितेने यास विरोध केला असता, आरोपीने तिच्याशी झोंबाझोंबी व मारहाण केली. त्यानंतर त्याने पीडितेला फरफटत नेऊन मारहाण करत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.
या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास पीडितेला व तिच्या मुलाला ठार मारण्याची (खल्लास करण्याची) धमकी आरोपीने दिली. तसेच नातेवाईकांमध्ये बदनामी करण्याची धमकी देत, पीडितेला घाबरवून आरोपीने तिच्यावर वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी सुरज पठाण विरोधात गु.र.क्र. ३३२/२०२२ अन्वये भा.दं.वि. कलम ३७६ (२) (एन), ३८४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.जी. बनसोडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश-३, श्री . आवटे यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. जिल्हा शासकीय अभियोक्ता महेंद्र बी. देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून, आरोपीस बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने आज (दि. १२ नोव्हेंबर २०२५) रोजी आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी व १७,००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. पाटोळे यांनी काम पाहिले.





