“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” – अर्थात, “सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे दमन.” हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य. पण धाराशिव जिल्ह्यातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या ब्रीदवाक्यालाच नव्हे, तर संपूर्ण खाकी वर्दीच्या इभ्रतीला काळिमा फासण्याचा जणू विडाच उचलला आहे. सर्वसामान्यांच्या रक्षणाची शपथ घेणारेच जेव्हा निर्लज्जपणे भक्षकाची भूमिका वठवू लागतात, तेव्हा सामान्यांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे?
लोहारा पोलीस ठाण्यातील प्रभारी सहायक पोलीस निरीक्षकासह चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडल्याची ताजी घटना, ही धाराशिव पोलीस दलातील सडलेल्या व्यवस्थेचे एक किळसवाणे उदाहरण आहे.
एका खुनाच्या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळावा म्हणून मदत करणाऱ्या तुळजापूर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला निलंबित केल्याची घटना ताजी असतानाच, लोहारा ठाण्याचा हा ‘नवा प्रताप’ समोर आला आहे. ही केवळ लाचखोरी नाही, तर ही उघड-उघड खंडणीखोरी आहे.
एका शेतकऱ्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात शेतकऱ्याला सह-आरोपी न करण्याच्या मोबदल्यात, हे चार ‘रक्षक’ त्याच्याकडे तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागतात. विचार करा, कायदा राबवण्यासाठी पगार घेणारेच कायदा तोडण्यासाठी ‘पैसे’ मागत आहेत.
या प्रकरणातील निर्लज्जपणाचा कळस म्हणजे, या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडून आधीच १० तोळ्यांचे सोन्याचे कडे आणि त्याच्या भावाकडून परस्पर ४ लाख रुपये उकळले होते! एवढे पैसे आणि सोने गिळूनही यांचे पोट भरले नाही. उरलेल्या २ लाखांसाठी त्यांनी त्या शेतकऱ्याचा छळ सुरूच ठेवला. अखेर या त्रासाला कंटाळून त्या शेतकऱ्याने एसीबीकडे धाव घेतली आणि हा सगळा ‘बाजार’ उघडकीस आला.
आता प्रश्न असा पडतो की, ही दोन-चार अधिकाऱ्यांची वैयक्तिक चूक आहे की संपूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड?
धाराशिव जिल्ह्यात आज कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. दररोज होणाऱ्या हाणामाऱ्या, चोऱ्या, दरोडे आणि बलात्काराच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. हे सर्व का घडत आहे? याचे उत्तर लोहारा आणि तुळजापूरच्या घटनांमध्ये दडले आहे.
जेव्हा कुंपणच शेत खाऊ लागते, जेव्हा रक्षकच भक्षक बनून सामान्य जनतेला लुटू लागतात, तेव्हा गुन्हेगारांना कोणाची भीती उरणार? पोलीसच जर खंडणी आणि ‘तोडपाणी’ करण्यात मग्न असतील, तर अवैध धंद्यांना आणि गुन्हेगारांना मोकळे रान मिळणारच.
पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे, हे निश्चितच स्वागतार्ह आहे. पण केवळ निलंबन किंवा अटकेची मलमपट्टी करून हा रोग बरा होणार नाही. ही कीड खोलवर पसरली आहे. एसीबीच्या जाळ्यात फक्त ‘ग्राहक’ स्वीकारणारा शिपाई किंवा ‘मध्यस्थ’ अडकला नाही, तर खुद्द ठाण्याचा ‘प्रभारी अधिकारी’ अडकला आहे.
याचाच अर्थ, ही एक संघटित टोळी बनली होती. या टोळीने अशा प्रकारे आणखी किती लोकांना लुटले असेल? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाचा तपास आता लोहारा पोलीस ठाण्यातच होणार असेल, तर ते ‘चोराच्या हातात तिजोरीच्या किल्ल्या’ देण्यासारखे होईल.
या चौघांवर कठोर कायदेशीर कारवाई तर व्हायलाच हवी, पण त्याचबरोबर अशा ‘प्रवृत्ती’ पोलीस दलातून कायमच्या ठेचून काढण्याची गरज आहे. अन्यथा, ‘सद्रक्षणाय’ हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर शोभेची वस्तू बनेल आणि सामान्य जनतेचा या खाकी वर्दीवरील विश्वास कायमचा उडेल.
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह





