बेंबळी: एका ३२ वर्षीय महिलेचे अंघोळ करतानाचे छायाचित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देऊन, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एका तरुणाविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित ३२ वर्षीय महिला (नाव आणि गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे) घरी एकटी असताना, गावातीलच एका तरुणाने तिच्या घरी येऊन धमकी दिली. “तुझे अंघोळ करतानाचे फोटो माझ्याकडे आहेत आणि ते मी व्हायरल करेल,” अशी भीती दाखवून आरोपीने पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केला.
घडलेल्या प्रकारानंतर पीडितेने १२ नोव्हेंबर २०२५ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. पीडितेच्या प्रथम खबरेवरुन, पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१), ३५१(२)(३), ३३२ तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (Atrocity Act) कलम ३(२)(व्ही) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.




