धाराशिव: जिल्ह्यात मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांचे सत्र सुरूच असून, विविध ठिकाणी चोऱ्या आणि घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नळदुर्ग येथे एकाच रात्रीत साडेअकरा लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला, तर धाराशिव शहरात उभ्या असलेल्या कंटेनरमधून डिझेल चोरीला गेले. भूम येथे जागेच्या वादातून कंपाऊंडचे पोल चोरून नेल्याचा प्रकारही समोर आला आहे. या सर्व घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नळदुर्गात मोठी घरफोडी, साडेअकरा लाखांचा ऐवज लंपास
सर्वात मोठी घटना नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हगलूर (ता. तुळजापूर) येथे घडली. फिर्यादी सतिष विश्वनाथ दराडे (वय ४२) यांच्या राहत्या घराला चोरांनी लक्ष्य केले. दि. १३ नोव्हेंबरच्या रात्री ११ ते दि. १४ नोव्हेंबरच्या सकाळी ६ च्या दरम्यान, अज्ञात चोराने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोराने कपाटातील २४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २ लाख ६५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ११ लाख ५६ हजार ४४३ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी सतिष दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भूम: जागेच्या वादातून कंपाऊंड पोलची चोरी
भूम येथे जागेचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने साहित्याची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ॲड. सुंदरराव भाऊसाहेब हुंबे (वय ६९, रा. समर्थनगर, भुम) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते ४ च्या दरम्यान लक्ष्मीनगर येथील त्यांच्या सरस्वती गृह निर्माण संस्थेच्या प्लॉटिंगमध्ये आरोपींनी बेकायदेशीर प्रवेश केला. सुरेश रावसाहेब आखाडे (रा. पारगाव, ता. वाशी), जेसीबी चालक सचिन मधुकर गायकवाड (रा. भुम) व इतर पाच जणांनी जागेतील कंपाऊंडच्या तारा तोडून ७ ते ८ पोल उखडून काढले. अंदाजे ५,५०० रुपये किमतीचे हे पोल चोरून नेण्यात आले. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
शेतीपंप आणि डिझेलही चोरीला
इतर घटनांमध्ये, मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेती साहित्याची चोरी झाली आहे. कदेर (ता. उमरगा) येथील शेतकरी हनुमंत रमेश औरादे (वय ५३) यांची मुरळी शेत शिवारातील गट नं. ५६ मधून १० हजार रुपये किमतीची ५ एचपीची पाण्याची मोटार अज्ञात चोराने चोरून नेली. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी घडली.
तर, धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिझेल चोरीची घटना घडली. छोटू मुन्ना खान (वय ४०, रा. जैतपूर, जि. मुरेना) यांच्या कंटेनर (क्र. आर जे १४ जीएल ८०४४) च्या डिझेल टाकीचे टोपण उघडून, अज्ञात व्यक्तीने २७ हजार ४२० रुपये किमतीचे ३०० लिटर डिझेल चोरून नेले. या सर्व प्रकरणांचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






