धाराशिव: – धाराशिव नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी विक्रमी संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत राजकीय घडामोडींनी वेग घेतला होता. या निवडणुकीत राज्याच्या राजकारणाप्रमाणेच धाराशिवमध्येही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठी फूट पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी वेगळी चूल मांडल्याने दोन्ही आघाड्यांना धक्का बसला आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी;
शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शरद पवार गटाने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे.
* शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्या जागावाटपानुसार, शिवसेनेला ३१ नगरसेवक जागा आणि नगराध्यक्षपद मिळाले आहे.
* काँग्रेसला १० नगरसेवक जागा सोडण्यात आल्या आहेत.
* महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांच्या पत्नी संगीता गुरव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महायुतीतही जागावाटपाचा गोंधळ; भाजपला नगराध्यक्षपद
महायुतीमध्येही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने वेगळा मार्ग स्वीकारला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र लढण्याची घोषणा केली असली, तरी त्यांच्यात नेमके किती जागावाटप झाले आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.
* महायुतीमध्ये नगराध्यक्षपद भाजपकडे आले आहे.
* प्राथमिक माहितीनुसार, भाजपकडून भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल काकडे यांच्या पत्नी नेहा काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे दोन्ही गट मैदानात
दोन्ही आघाड्यांमधून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवार दिले आहेत.
* राष्ट्रवादी शरद पवार गट: माजी नगराध्यक्ष खलिफा कुरेशी यांच्या पत्नी परवीन कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
* राष्ट्रवादी अजित पवार गट: पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ॲड. विशाल साखरे यांच्या पत्नी ॲड. मंजुषा साखरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शेवटच्या दिवशी झालेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे आणि प्रमुख पक्षांमध्ये पडलेल्या फुटीमुळे धाराशिव नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी लक्षवेधी ठरणार आहे.






