तुळजापूर – संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पिटू उर्फ विनोद गंगणे याला भारतीय जनता पक्षाने (भाजप) थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. या धक्कादायक निर्णयामुळे तुळजापूरच्या राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विनोद गंगणे हा आमदार राणा पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वीच त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती. सुमारे एक महिना तुरुंगवास भोगल्यानंतर तो नुकताच जामिनावर बाहेर आला आहे. तुरुंगातून सुटल्याच्या काही दिवसातच त्याला भाजपकडून थेट नगराध्यक्ष पदाचे तिकीट मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच आमदार राणा पाटील यांनी याच ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेले दोन माजी नगराध्यक्ष, बापू कणे आणि संतोष परमेश्वर कदम, यांना भाजपमध्ये जाहीर प्रवेश दिला होता. त्यावेळीही या पक्षप्रवेशावरून बरीच चर्चा झाली होती.
आधी ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना पक्षात घेणे आणि आता थेट एका प्रमुख आरोपीला नगराध्यक्ष पदासारख्या महत्त्वाच्या पदाची उमेदवारी देणे, या भाजपच्या भूमिकेमुळे तुळजापूरच्या राजकारणात खळबळ उडाली असून या निर्णयावर जोरदार टीका होत आहे.







