तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील खडकी येथील जमिनीचे चक्क नवी दिल्ली येथे बनावट कुलमुखत्यारपत्र (Power of Attorney) तयार करून मूळ मालकाची आणि शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिल्लीतील एका व्यक्तीसह सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अशा एकूण ६ जणांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खडकी (ता. तुळजापूर) येथील गट नं. ४१ मधील ०२ हेक्टर ८५ आर या जमिनीचे मूळ मालक अशोक गणपतराव दीक्षित आणि इतर पाच जण आहेत. मात्र, आरोपींनी संगनमत करून ३० जून २०२५ ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत दिल्ली येथील दुय्यम निबंधक कार्यालय (क्र. ९, कपशेडा, नवी दिल्ली) आणि तुळजापूर दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रांचा वापर केला.
अशी केली फसवणूक:
आरोपींनी जमिनीचे मूळ मालक अशोक दीक्षित व इतरांचे दिल्ली येथे बनावट अधिकार पत्र (कुलमुखत्यार पत्र) बनवून घेतले. हे कागदपत्र खरे असल्याचे भासवून, त्याआधारे तुळजापूर दुय्यम निबंधक कार्यालयात खोटा दस्तऐवज तयार केला. याद्वारे जमिनीचे मूळ मालक आणि शासनाची मोठी फसवणूक करण्यात आली.
या ६ जणांवर गुन्हा दाखल:
या प्रकरणी बालाजी मादसवार यांनी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून खालील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१. अजयकुमार यादव (रा. एच ३०५-३०२, साधानगर, पालम गाव, दिल्ली)
२. झापू लक्ष्मण राठोड (रा. खडकी, ता. तुळजापूर)
३. नितीन शाम भंडारे (रा. खडकी, ता. तुळजापूर)
४. शिवाजी अंबादास जवान (रा. खडकी, ता. तुळजापूर)
५. अय्युब राजन पटेल (रा. बोरामणी, ता. द. सोलापूर)
६. संदीप नवनाथ पाटील (रा. मुळेगाव तांडा, ता. द. सोलापूर)
तुळजापूर पोलिसांनी या सर्वांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) (फसवणूक), ३३६(२), ३३६(३), ३३८(३), ३४०(२) आणि भारतीय नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८५ अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.







