तुळजापूर: कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा वर्षातील महत्त्वाचा समजला जाणारा ‘शाकंभरी नवरात्र महोत्सव’ यंदा २० डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.
यावेळी आगामी महोत्सवाचे नियोजन, भाविकांची सुरक्षा, दर्शन रांग व्यवस्थापन, स्वच्छता आणि पूजाविधींचे नेटके आयोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
असा असेल महोत्सवाचा कार्यक्रम:
या बैठकीत नवरात्र महोत्सवातील धार्मिक विधींचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून ते खालीलप्रमाणे आहे:
-
२० डिसेंबर ते २८ डिसेंबर: आई तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा (शयन) परंपरेनुसार सुरू राहणार आहे.
-
२८ डिसेंबर: पहाटे देवींची सिंहासनावर प्रतिष्ठापना होईल. तसेच दुपारी १२ वाजता घटस्थापना होऊन महोत्सवाला अधिकृत सुरुवात होईल.
-
२९ डिसेंबर: रथ अलंकार महापूजा.
-
३० डिसेंबर: मुरली अलंकार महापूजा.
-
३१ डिसेंबर: सकाळी जलयात्रा तसेच शेषशायी अलंकार महापूजा.
-
१ जानेवारी: भवानी तलवार अलंकार महापूजा.
-
२ जानेवारी: महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा.
-
३ जानेवारी (शाकंभरी पौर्णिमा): देवीची नित्योपचार पूजा, दुपारी १२ वाजता पूर्णाहुती व घटोत्थापन.
-
४ जानेवारी: भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन.
या काळात मोठ्या संख्येने भाविक तुळजापुरात दाखल होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून विशेष नियोजन करण्यात येणार आहे. तसेच मंदिर परिसरात स्वच्छता आणि आरोग्य विभागाची पथके तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवून हा उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
या आढावा बैठकीस तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमरराजे कदम, अनंत कोंडो यांच्यासह मंदिर संस्थानाचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







