शिराढोण – महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पानमसाल्याची अवैध विक्री करण्यासाठी वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर शिराढोण पोलिसांनी कारवाई केली आहे. शिराढोण ते कोल्हेगाव रोडवरील हासेगाव पाटीजवळ ही कारवाई करण्यात आली असून, दुचाकीसह सुमारे ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वहाब जब्बार मनियार (वय ५५, रा. इस्लामपुरा, कळंब, ता. कळंब) हा आपल्या दुचाकीवरून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुससार, मंगळवारी (दि. १८) सकाळी १०:५० वाजता शिराढोण पोलिसांनी हासेगाव पाटीजवळ त्याला अडवले.
त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे विक्रीसाठी बाळगलेला विमल पान मसाला, राजनिवास पान मसाला, डायरेक्टर पान मसाला, गोवा, जाफरानी जर्दा, शॉट पत्ती आणि तंबाखू असा शासनाने प्रतिबंधित केलेला साठा आढळून आला. पोलिसांनी गुटखा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ४८,१४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात आरोपी वहाब मनियार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







