तुळजापूर: तुळजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपने ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला उमेदवारी जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या निर्णयावरून विरोधकांनी भाजप आणि महायुती सरकारला धारेवर धरले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
‘वॉशिंग मशीन’वर सडकून टीका
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत भाजपच्या या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला आहे. “ड्रग प्रकरणातील आरोपी आता लोकप्रतिनिधी होणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महायुती सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, सरकारची ‘वॉशिंग मशीन’ आता कमाल करत आहे. आधी केवळ भ्रष्ट लोकांना पवित्र केले जात होते, आता तर ड्रग्ज प्रकरणात तीन महिने तुरुंगात राहून आलेल्या व्यक्तीला थेट भाजपकडून उमेदवारी दिली जात आहे, असे वृत्त आहे.
पोलिसांच्या मनोधैर्यावर प्रश्नचिन्ह
या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आणि मनस्थितीवर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. “ज्या पोलिसांनी विनोद गंगणे याला पकडले असेल, त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, आम्ही गुन्हेगार पकडायचे की सरकारला उमेदवार मिळवून द्यायचे?” असा टोला त्यांनी लगावला.
गृहमंत्र्यांवर निशाणा
राज्याच्या गृहमंत्र्यांवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, यापुढे ड्रग, चोरी किंवा दरोडा अशा प्रकरणांत कारवाई करताना पोलीस दहा वेळा विचार करतील. कारण गृहमंत्री अशा आरोपींना ‘क्लीनचिट’ देऊन थेट पक्षात प्रवेश देतील, तिकीट देतील आणि नेता बनवतील. कदाचित यापुढे गृहविभाग गुन्हेगार शोधण्याऐवजी भाजपला उमेदवार शोधून देण्याचे ‘राष्ट्रकार्य’ करेल काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यास नवल वाटू नये, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
भाजपच्या या उमेदवारीवरून तुळजापूरसह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, आता भाजप या टीकेला काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








