धाराशिव: ग्रामपंचायतीच्या कामात सदस्याच्या जवळच्या नातेवाईकाने हितसंबंध जोपासणे किंवा कंत्राट घेणे हे कायद्याने निषिद्ध असतानाही, बेंबळी (ता. धाराशिव) येथील ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाने ग्रामपंचायतीचे काम केल्याचे सिद्ध झाल्याने संबंधित महिला सदस्याला आपले पद गमवावे लागले आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ग) अन्वये हा महत्त्वपूर्ण निकाल देत बेंबळी ग्रामपंचायतीच्या सदस्या आणि भाजप प्रणित सरपंच श्रीमती फातीमा सत्तार शेख यांना अपात्र ठरविले आहे.
नेमके प्रकरण काय?
बेंबळी येथील आकाश जगनमित्र मुगळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केलेल्या विवाद अर्जानुसार, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती फातीमा सत्तार शेख यांचा मुलगा समद सत्तार शेख याने १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतीची दोन कामे केली होती. ग्रामपंचायत सदस्याच्या मुलानेच ग्रामपंचायतीचे कंत्राट घेऊन आर्थिक लाभ मिळवल्याने, हे कलम १४ (१) (ग) चे उल्लंघन असून त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी मुगळे यांनी केली होती.
बचाव पक्षाचा युक्तिवाद आणि गटविकास अधिकाऱ्यांचा अहवाल
या प्रकरणात श्रीमती शेख यांनी आपला बचाव करताना दावा केला की, त्यांचा मुलगा समद हा २०२२ पासून त्यांच्यापासून विभक्त राहतो आणि त्याचे रेशनकार्डही वेगळे आहे. तसेच, गटविकास अधिकारी (BDO), पंचायत समिती धाराशिव यांनी सादर केलेल्या अहवालातही, कामाचा आदेश देण्यापूर्वीच रेशनकार्ड विभक्त झाल्याचे नमूद करत, हे कलम १४ (१) (ग) चे उल्लंघन नसल्याचा अभिप्राय दिला होता.
जिल्हाधिकाऱ्यांचे निरीक्षण आणि आदेश
मात्र, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि कायदेशीर बाबी तपासून पाहताना स्पष्ट केले की, जरी रेशनकार्ड वेगळे असले तरी, ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाने (समद सत्तार शेख) ग्रामपंचायतीच्या आदेशानुसार काम केल्याचे आणि त्याचे पैसे (बिल) उचलल्याचे सिद्ध होत आहे.
कामाचे कार्यारंभ आदेश आणि देयके अदा केल्याच्या तारखा पाहता, सदस्याचा आपल्या मुलामार्फत ग्रामपंचायतीच्या कामात आणि सेवेत प्रत्यक्ष हितसंबंध असल्याचे स्पष्ट होते. विभक्त राहत असल्याचा दावा असला तरी, ‘हितसंबंध’ (Interest) या कायदेशीर मुद्द्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदाराचा युक्तिवाद ग्राह्य धरला.
यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार, श्रीमती फातीमा सत्तार शेख यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या निकालामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली असून, नातेवाईकांच्या नावे कंत्राटे घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
महत्त्वाचे मुद्दे:
-
तक्रारदार: आकाश जगनमित्र मुगळे (रा. बेंबळी).
-
अपात्र सदस्य: श्रीमती फातीमा सत्तार शेख (रा. बेंबळी).
-
कारवाईचे कारण: महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ग) भंग (मुलाने ग्रामपंचायतीचे काम घेतल्याने).
-
निकाल दिनांक: १९ नोव्हेंबर २०२५.







