तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची आणि स्थानिक नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तुळजापूरच्या जुन्या बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील १ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लंपास केले.
एकीकडे शहरात चोऱ्यांचे सत्र सुरू असताना, पोलीस मात्र अवैध धंदेवाल्यांकडून ‘हप्ते’ घेण्यात मग्न असल्याची संतप्त चर्चा शहरात सुरू झाली आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी फुलावती शंकर राठोड (वय ५५, रा. श्रीनाथ मंगल कार्यालयाजवळ, नळदुर्ग रोड, तुळजापूर) या १८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास जुन्या बसस्थानकावर बसमधून खाली उतरत होत्या. त्यावेळी बसमध्ये आणि स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती.
याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण (किंमत अंदाजे १,४०,००० रुपये) हातचलाखीने चोरून नेले. गर्दीतून बाहेर आल्यानंतर गळ्यातील दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.या प्रकरणी फुलावती राठोड यांनी १९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, शहरात सध्या पाकीटमारी आणि दागिने चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. भाविकांना लुटण्याचे प्रकार दररोज घडत आहेत. असे असतानाही पोलीस प्रशासन चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरत आहे. पोलीस केवळ अवैध धंदेवाल्यांकडून हप्ते वसुलीतच मग्न असल्याने गुन्हेगारांना मोकळे रान मिळाल्याचा आरोप आता नागरिक आणि भाविकांमधून केला जात आहे.






