धाराशिव – तालुक्यातील वाघोली शिवारात असलेल्या एका स्टोन क्रेशरवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लैंगिकतेवरून चिडवल्याचा राग मनात धरून एका मजुराने आपल्याच सहकाऱ्याचा लोखंडी पाईपने डोके फोडून निर्घृण खून केला. ही घटना २० नोव्हेंबर रोजी घडली असून, या हल्ल्यात अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली शिवारात ‘अजमेरा स्टोन क्रेशर’ आहे. या ठिकाणी झारखंड राज्यातील काही मजूर काम करतात व तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. आरोपी सुमितकुमार सत्येंद्र सिंग (रा. उपर हटिया पिठ्याटोली, जि. रांची, झारखंड) आणि मयत सुनिल गांगु कुजुर (वय ३१, रा. रांची, झारखंड) हे दोघेही येथेच वास्तव्यास होते.
२० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास मयत सुनिल कुजुर याने आरोपी सुमितकुमार याला लैंगिकतेवरून चिडवले. या गोष्टीचा प्रचंड राग आल्याने आरोपी सुमितकुमार याने तिथे पडलेला एक चौकोनी लोखंडी पाईप उचलला आणि सुनिलच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. हा मार इतका वर्मी लागला की यामध्ये सुनिल कुजुर याचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या वादात मध्यस्ती करणाऱ्या किंवा तिथे उपस्थित असलेल्या अन्य मजुरांवरही हल्ला चढवला. यात धनेश खासा मुंडा (रा. रांची) यालाही लोखंडी पाईपने मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी मागन करोम लोहरा (वय ६७, रा. जि. खुटी, झारखंड) यांनाही मारहाण करून जखमी केले.
याप्रकरणी जखमी मागन लोहरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी सुमितकुमार सत्येंद्र सिंग याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून), १०९(१) (खुनाचा प्रयत्न) आणि ११८(१) (दुखापत करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






