धाराशिव : धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. ‘युतीधर्मा’च्या गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाच्या पाठीत खंजीर खुपसत, ठरलेला शब्द मोडला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत १७ जागा शिंदे गटाला देण्याचे ठरले असताना, भाजपने विश्वासघात करत सर्वच्या सर्व ४१ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. या प्रकारामुळे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे प्रचंड संतापले असून, त्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.
नेमकं काय घडलं?
धाराशिव नगर परिषदेसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचे सूत्र ठरवण्यासाठी मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला पालकमंत्री प्रताप सरनाईक, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे , भाजपचे आमदार राणा पाटील आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ठरल्यानुसार, नगर परिषदेच्या एकूण जागांपैकी १७ जागा शिवसेना शिंदे गटाला आणि उर्वरित २४ जागा भाजपला देण्याचे निश्चित झाले होते. तसेच नगराध्यक्षपद भाजपला देण्यावरही एकमत झाले होते.
भाजपची खेळी आणि शिंदे गटाचा भ्रमनिरास
मुंबईतील फॉर्म्युल्यानुसार, जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी आपल्या वाट्याला आलेल्या १७ जागांसाठी उमेदवारांची यादी घोषित करून त्यांना पक्षाचे एबी फॉर्म (AB Form) देखील वाटप केले होते. मात्र, दुसरीकडे भाजपने आपली यादी जाहीर न करता शिंदे गटाला शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवले.
अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपचे खरे रूप समोर आले. भाजपने गुपचूपपणे सर्व ४१ प्रभागांमध्ये आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याचे स्पष्ट झाले. यामुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली असून, मित्रपक्षानेच पाठीत खंजीर खुपसल्याची भावना निर्माण झाली आहे.
साळुंखे यांचा आमदार राणा पाटलांवर हल्लाबोल
या विश्वासघातामुळे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अत्यंत विश्वासघातकी राजकारण केले असून, मित्रपक्षाला संपवण्याचा घाट घातल्याचा आरोप साळुंखे यांनी केला आहे. “भाजपने केलेल्या या दगाफटक्याची किंमत त्यांना निवडणुकीत मोजावी लागेल,” असा इशाराही साळुंखे यांनी दिला आहे.
भाजपच्या या एकाधिकारशाहीमुळे धाराशिव शहरात महायुतीत उभी फूट पडली असून, आता दोन्ही पक्ष आमनेसामने लढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.





