धाराशिव – धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी ७ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता अंतिम रिंगणात ६ उमेदवार उरले आहेत. यामुळे धाराशिवमध्ये नगराध्यक्षपदासाठी अत्यंत अटीतटीची आणि ‘चौरंगी’ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या जागेवर चार प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार दिले आहेत. यामध्ये भाजपकडून नेहा राहुल काकडे, शिवसेना (ठाकरे गट) कडून संगीता सोमनाथ गुरव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून परवीन खलिफा कुरेशी आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून ॲड. मंजुषा विशाल साखरे यांच्यात तुल्यबळ सामना रंगणार आहे.
युतीचा फज्जा
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी महायुतीत “सर्व काही अलबेल” असल्याचे वारंवार सांगितले असले तरी, जमिनीवरची परिस्थिती वेगळीच आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युती प्रत्यक्षात फिसकटली आहे. शिंदे गटाचे एकूण १७ उमेदवार रिंगणात असून त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार उभे ठाकले आहेत. त्यामुळे शिंदे गटाची अवस्था काहीशी दयनीय झाल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, भाजप गोटात ‘ओव्हर कॉन्फिडन्स’ दिसून येत आहे. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवडणुकीची रणनीती कुठेतरी चुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या रणनीतीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाची मजबूत आघाडी
महाविकास आघाडीमध्ये मात्र शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात मजबूत समन्वय दिसून येत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली असून, त्यांचे जमिनीवरचे (ग्राउंड लेव्हल) काम भाजपच्या आव्हानाला पुरुन उरेल असे दिसत आहे.
दादांच्या गटाचा ‘एकला चलो रे‘
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने स्वतंत्र भूमिका घेत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. ॲड. मंजुषा साखरे यांच्या उमेदवारीमुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
आता ही चौरंगी लढत कोण जिंकणार आणि धाराशिववर कुणाचा झेंडा फडकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







