धाराशिव : धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात महायुतीचे सरकार असले तरी, स्थानिक पातळीवर मात्र महायुतीत मोठी बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील युती तुटली असून, शिंदे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे नेते सुधीर पाटील यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका करत, “राणा पाटील यांचे ‘इलेक्टिव्ह मेरीट’ म्हणजे त्यांची हुजरेगिरी,” असा घणाघात केला आहे.
युती तुटली, शिंदे गट २१ जागांवर लढणार
धाराशिव नगर परिषदेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जागा वाटपावरून एकमत होऊ शकले नाही. सन्मानजनक जागा मिळत नसल्याने अखेर शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने शहरात एकूण २१ उमेदवार उभे केले असून, आता या ठिकाणी ‘फ्रेंडली फाईट’ ऐवजी थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
सुधीर पाटलांचा हल्लाबोल
पत्रकार परिषदेत बोलताना सुधीर पाटील यांनी राणा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आणि उमेदवारी निवडीच्या निकषांवर जोरदार आक्षेप घेतला. ते म्हणाले की, “आम्ही युतीधर्माचे पालन करण्यासाठी तयार होतो, मात्र समोरून प्रतिसाद मिळाला नाही. राणा पाटील यांच्याकडून वारंवार ‘इलेक्टिव्ह मेरीट’चा उल्लेख केला जातो. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, राणा पाटील यांचे ‘इलेक्टिव्ह मेरीट’ म्हणजे केवळ त्यांची ‘हुजरेगिरी’ करणे हेच आहे. जे त्यांच्या पुढे-पुढे करतील, त्यांनाच संधी मिळते, असा टोलाही त्यांनी लगावला.”
सुधीर पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता भाजप या टीकेला काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लढाई अटळ
शिवसेना शिंदे गटाने २१ उमेदवार रिंगणात उतरवल्याने आता भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रभागनिहाय गणिते बदलणार असून, मविआ विरुद्ध महायुती अशा सरळ लढतीऐवजी आता अनेक प्रभागांत तिरंगी किंवा चौरंगी लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.






