नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी पाटी (फुलवाडी) येथे यात्रेमध्ये काम करण्याच्या वादातून आणि जुन्या कुरापतून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत लोखंडी रॉड, काठ्या, कोयता आणि दगडांचा वापर करण्यात आला असून दोन्ही गटातील व्यक्ती जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकी घटना काय?
ही घटना २१ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहा ते पावणेबाराच्या सुमारास धनगरवाडी पाटी आणि महाराजा हॉटेल परिसरात घडली. यात्रेत अध्यक्षांच्या सांगण्यावरून काम केल्याचा राग मनात धरून हा वाद झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पहिला गट (फिर्यादी: बळीराम हिप्परगे)
बळीराम बाबु हिप्परगे (वय ३४, रा. फुलवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता हांडगे वस्ती येथे आरोपींनी “तुम्ही यात्रेमध्ये अध्यक्षांच्या सांगण्यावरून काम करून आम्हाला अपमानित केले,” असे म्हणत वाद घातला. यावेळी आरोपींनी लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करून बळीराम हिप्परगे यांना गंभीर जखमी केले. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेले गुरुराज हांडगे आणि सुदर्शन हांडगे यांनाही मारहाण केली.
-
दाखल गुन्हे: याप्रकरणी चेतन विश्वनाथ हांडगे, विजय हरी हांडगे, संकेत महादेव कावळे, विठ्ठल विश्वनाथ हांडगे, विश्वनाथ राम हांडगे, नागनाथ मारुती हांडगे, अजय हांडगे, सागर झुरळे (सर्व रा. फुलवाडी), गणेश उर्फ तम्मा मुळे, रवि टिळेकर, पृथ्वीराज मुळे, शरण मुळे, शिवराज निवृत्ती बोंगरगे (सर्व रा. अणदुर) व समर्थ हिप्परगे यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम ११८(२), ११८(१), १८९, ३५२, ३५१(२) सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरा गट (फिर्यादी: शिवराज बोंगरगे)
दुसऱ्या बाजूने, शिवराज निवृत्ती बोंगरगे (वय २०, रा. अणदुर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याच रात्री ११.४० वाजता महाराजा हॉटेल (धनगरवाडी पाटी) येथे आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी, कोयता, विळे, काठी आणि उसाच्या कांडक्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले. यात शरद मुळे, त्यांची आई, काका आणि बहीण यांनाही मारहाण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
-
दाखल गुन्हे: याप्रकरणी गुरुराज नागनाथ हांडगे, सुदर्शन संजय हांडगे, रामानंद रिंगणे, कल्लेश्वर महादेव हिप्परगे, बळी बाबुराव हिप्परगे, श्रीशैल हिप्परगे, रामचंद्र हांडगे (सर्व रा. फुलवाडी) यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम ११८(१), १८९, १९१, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.






