धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात गेल्या २४ तासांत चोरी आणि अवैध व्यवसायाशी संबंधित विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उमरगा तालुक्यात पवनचक्कीच्या प्रोजेक्टमधून तब्बल १५ लाखांची वायर चोरीला गेल्याची मोठी घटना समोर आली आहे. तर वाशी पोलिसांनी पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या गाड्यांमधून पेट्रोल चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. यासह भूम आणि कळंब येथे दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत.
उमरगा: पवनचक्कीचे १५ लाखांचे साहित्य लंपास
उमरगा तालुक्यातील नारंगवाडी शिवारामध्ये जे.एस. डब्ल्यू (JSW) कंपनीच्या पवनचक्की वीज निर्मिती प्रोजेक्टमधून मोठ्या प्रमाणात तांब्याच्या केबलची चोरी झाली आहे. दि. १४ जून २०२५ ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी प्रोजेक्टच्या स्टोअर रूममधून स्टार्टर पॉवर केबल, रोटर पॉवर केबल, अर्थिंग केबल आणि इतर साहित्यासह एकूण १५ लाख ७८ हजार २५५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी शिवाजी प्रभाकर गायकवाड (रा. नळदुर्ग) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी: पेट्रोल चोरी करणारी टोळी गजाआड
वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदापूर शिवारातील साहील पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या वाहनांमधून पेट्रोल चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. रोहीत युवराज ओव्हाळ, साहील जब्बार शेख आणि अमीर अन्वर शेख (सर्व रा. भूम) असे आरोपींची नावे आहेत. हे आरोपी त्यांच्याकडील शाइन मोटारसायकल (एमएच २५ एएम ५४५६) वापरून पेट्रोल चोरी करत असताना आढळून आले. पोलीस कर्मचारी अमोल गोडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबी/वाशी: अवैध खडी वाहतूक करणारा टिप्पर जप्त
अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात कारवाई करत महसूल विभागाने एका टिप्परवर कारवाई केली आहे. संकेत होगले (रा. घारगाव, ता. करमाळा) हा आपल्या टिप्परमधून (एमएच १२ आरएन ९३७) ३ ब्रास खडीची अवैध वाहतूक करताना मिळून आला. या कारवाईत ८ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल (टिप्पर व खडी) जप्त करण्यात आला आहे. ग्राममहसूल अधिकारी विकास कोळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूम आणि कळंबमध्ये दुचाकी चोरी
-
भूम: किरण विठ्ठल काळे यांची टीव्हीएस स्टार मोटारसायकल (एमएच २५ एई ०२२४) कुंथलगिरी रोडवरील शेळके यांच्या आडत दुकानासमोरून चोरीला गेली. या गाडीची किंमत १५ हजार रुपये असून भूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
-
कळंब: अविनाश हनुमंत भिसे यांची हिरो होंडा डीलक्स (एमएच १३ डीएच ६६२१) ही २० हजार रुपये किमतीची दुचाकी प्रियदर्शनी बँकेसमोरून चोरीला गेली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.






