नळदुर्ग – केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत नळदुर्ग शहरासाठी रु. ४३.६७ कोटीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस आज राज्य स्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची मंजुरी प्राप्त झाली असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
नळदुर्ग शहरासाठीची जुनी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली असून शहराची वाढलेली लोकसंख्या, अपुरी वितरण व्यवस्था व गळतीमुळे काही भागात पाणीच पोचत नसून काही भागात अत्यल्प दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तसेच नळदुर्ग शहर पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी कामे हाती घेतलेली असून यामुळे शहराच्या तरल लोकसंख्येत पुढील काळात मोठी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत या योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.
या सर्व बाबी विचारात घेऊन नवीन पाणीपुरवठा योजनेची आखणी करण्यात आली असून प्रति माणसी प्रतिदिन १३५ लिटर प्रमाणे योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.
या योजनेच्या माध्यमातुन शहरातील ५०९५ घरांना नळ जोडणी करण्यात येणार आहे. योजनेत सहा पाण्याच्या टाक्यां, नवीन जल शुद्धीकरण केंद्र, पंप हाऊस सह वितरण व्यवस्थेचे काम करण्यात येणार आहे. या योजनेतील उपांगांकरिता आवश्यक जमीन नगरपरिषदे कडे उपलब्ध आहे.
आज झालेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीमध्ये या रुपये ४३.६७ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली आहे. अस्तीत्वातील पाणी पुरवठा योजनेमुळे सध्या ७ ते ८ दिवसांनी मिळणारे पाणी नवीन योजनेमुळे दैनदिन मिळणार आहे., असेही आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले.