धाराशिव: राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो, हे वाक्य तर जुने झाले. पण धाराशिवच्या पालकमंत्र्यांनी तर कमालच केली! अवघ्या दोन तासांत आपली भूमिका बदलून त्यांनी राजकीय निरीक्षकांनाही चक्रावून सोडले आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उमरग्यात एकाला ‘सुनावले’ आणि धाराशिवमध्ये येताच त्याच व्यक्तीला ‘मित्र’ मानून गळाभेट घेतली. या ‘राजकीय यु-टर्न’ची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.
नेमकं काय घडलं दोन तासांत?
घडलं असं की, उमरग्यात सायंकाळी ७.४५ वाजता पालकमंत्री सरनाईक यांनी भाषणात अप्रत्यक्षपणे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना लक्ष्य केले. “दोन भावांच्या वादात जिल्ह्याचा विकास खुंटला,” असे सांगत त्यांनी राणा पाटलांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण, घड्याळाचे काटे फिरले आणि पालकमंत्री ९.४५ वाजता धाराशिवमध्ये पोहोचले. तिथे चित्रच वेगळं! मंचावरून त्यांनी चक्क भाजपसोबत ‘महायुतीचा धर्म’ पाळणार असल्याचे सांगत, राणा पाटील यांचा उल्लेख ‘मित्र’ म्हणून केला. उमरग्यातली टीका धाराशिवच्या वाटेवरच विरली की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
शिंदे सेनेचे ‘विमान’ भरकटले! कुठे मैत्री, कुठे कुस्ती, तर मुरूममध्ये चक्क ‘दोन्ही सेना’ एकत्र?
विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यात महायुतीचे तीन तेरा वाजले आहेत. विशेषतः शिवसेना (शिंदे गट) ची अवस्था तर “धड ना इकडे, धड ना तिकडे” अशी झाली असून, संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचे ‘विमान’ भरकटल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ८ नगर परिषदांमध्ये राजकीय सोयीनुसार बनवलेल्या आघाड्या पाहून मतदारांना प्रश्न पडलाय की, नक्की युती आहे कोणाशी?
जिल्ह्यात ८ नगर परिषदा, ८ तऱ्हेची राजकारण!
राज्यात एका ताटात जेवणारे भाजप आणि शिंदे गट जिल्ह्यात मात्र एकमेकांचे कपडे फाडताना दिसत आहेत.
-
भूम, परांडा, उमरगा, तुळजापूर: येथे ‘महायुती’ फक्त कागदावरच उरली आहे. या चारही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असा थेट सामना रंगला आहे.
-
कळंब आणि नळदुर्ग: केवळ या दोन ठिकाणीच काय ती भाजप-शिंदे सेनेची ‘युती’ अस्तित्वात आहे. बाकी सगळीकडे आनंदच आहे!
धाराशिवमध्ये ‘अर्धी’ मैत्री!
जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी म्हणजे धाराशिवमध्ये तर राजकारणाचा अत्यंत विचित्र नमुना पाहायला मिळत आहे. येथे शिंदे गटाने भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे, पण नगरसेवक पदासाठी ४१ पैकी तब्बल २१ ठिकाणी ‘मैत्रीपूर्ण लढत’ जाहीर केली आहे. म्हणजे नगराध्यक्षाला मत द्यायचं, पण नगरसेवकाला पाडायचं, असा हा ‘मैत्रीचा’ प्रकार आहे.
शिंदे गटातच ‘अंतर्गत युद्ध’: सावंत विरुद्ध सरनाईक


पक्षाचे विमान भरकटण्यामागे मूळ कारण पक्षातील अंतर्गत गटबाजी आहे. शिंदे सेनेतच माजी पालकमंत्री तानाजी सावंत आणि विद्यमान पालकमंत्री प्रताप सरनाईक असे दोन तट पडले आहेत. सरनाईक गट आणि सावंत गट एकमेकांना शह-काटशह देण्यात मग्न असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.
भूम-परांड्यात ‘सावंत’ एकाकी!
भूम आणि परांड्यात तर राजकारणाने वेगळेच वळण घेतले आहे. येथे तानाजी सावंत यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी उभी राहिली आहे. विशेष म्हणजे या आघाडीत सावंत यांचे राज्य पातळीवरील मित्र पक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे देखील सामील झाले आहेत. त्यामुळे सावंतांना घरातल्यांनीच घेरल्याचे चित्र आहे.
मुरूममध्ये तर ‘कहर’च!
सगळ्यात धक्कादायक समीकरण मुरूम नगर परिषदेत जुळले आहे. तिथे चक्क शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) एकत्र आले आहेत! राज्यात जे दोन गट एकमेकांचे तोंड बघायला तयार नाहीत, ते मुरूममध्ये गळ्यात गळे घालून प्रचार करत आहेत.
थोडक्यात: सत्तेसाठी वाटेल ते समीकरण जुळवायचे, या नादात धाराशिव जिल्ह्यात महायुतीचा आणि विशेषतः शिंदे गटाचा पुरता गोंधळ उडाला आहे. हे भरकटलेले ‘विमान’ लँडिंग करणार की क्रॅश होणार, हे निकालाच्या दिवशीच कळेल!






