तुळजापूर – तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी आज (दि. २) झालेल्या मतदानात तुळजापूरकर मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला आहे. शहरात तब्बल ८०.२८ टक्के मतदान झाले असून, एकूण २३ हजार ७३३ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी, निकालासाठी मात्र तब्बल १९ दिवस म्हणजेच २१ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
तुळजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आज शांततेत मतदान पार पडले. सकाळी ७.३० वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, शहरात मतदानाचा टक्का विक्रमी राहिला आहे.
स्त्रीशक्तीचा जागर, पण मतदानात पुरुष आघाडीवर!
या निवडणुकीत एकूण २९,५६१ मतदारांची नोंदणी होती. यामध्ये महिला मतदारांची संख्या (१५,०१७) ही पुरुष मतदारांपेक्षा (१४,५३८) जास्त होती मात्र, प्रत्यक्ष मतदानात पुरुषांनी निसटती आघाडी घेतली आहे.
-
एकूण मतदान: २३,७३३ (८०.२८%)
-
पुरुष मतदान: ११,९३०
-
महिला मतदान: ११,७९९
-
इतर: ४
सकाळपासूनच उत्साह
सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासांतच ३,५३६ (११.९६%) मतदारांनी मतदान केले होते. दुपारनंतर हा वेग वाढला आणि दुपारी ३.३० पर्यंत मतदानाचा आकडा १४,१८२ (४७.९७%) वर पोहोचला होता. शेवटच्या टप्प्यात म्हणजेच सायं. ५.३० वाजेपर्यंत ही टक्केवारी ८० च्या घरात पोहोचली.
उमेदवारांचे ‘टेन्शन’ वाढले!
आज मतदान पार पडले असले तरी मतमोजणी थेट २१ डिसेंबर रोजी होणार आहे. साधारणपणे मतदानानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी निकाल लागतो, पण येथे तब्बल १९ दिवसांचा कालावधी असल्याने उमेदवारांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. ईव्हीएम मशीनमध्ये कैद झालेले हे भवितव्य आता २१ तारखेलाच उघडणार असल्याने, तोपर्यंत ‘कोण जिंकणार आणि कोण पडणार?’ या चर्चांना उधाण येणार आहे.





