धाराशिव: कामासाठी आलेल्या तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) या दोघांना दोषी ठरवत न्यायालयाने ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. उमरगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती के. एम. एफ. खान यांनी आज (दि. ३) हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निकालामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
संतोष बाबुराव गायकवाड (वय ४३, तत्कालीन पोलीस निरीक्षक, पो. ठाणे लोहारा) आणि शाहूराज महादेव भीमाळे (वय ५२, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो. ठाणे लोहारा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
नेमके प्रकरण काय?
यातील मूळ तक्रारदार सुरेश गुंडेराव वाघ (रा. लोहारा) यांनी एका शिक्षण संस्थेच्या विरोधात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तसेच, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहूराज भीमाळे यांनी ही लाचेची रक्कम स्वीकारली आणि गायकवाड यांनी त्याला प्रोत्साहन दिले. याप्रकरणी २०१६ मध्ये लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. २१/२०१६) दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाचा निकाल
सदर खटल्याची सुनावणी उमरगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात पार पडली. सरकारी पक्षातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवले.
-
आरोपी क्र. १ (संतोष गायकवाड): ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५००० रुपये दंड.
-
आरोपी क्र. २ (शाहूराज भीमाळे): ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५००० रुपये दंड.
तपास आणि पैरवी
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपअधीक्षक (ला.प्र.वि.) अश्विनी भोसले आणि बी. व्ही. गावडे यांनी केला. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता संदीप देशपांडे यांनी प्रभावी बाजू मांडली.
या खटल्यात ट्रायल ऑफिसर म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विजय वगरे, पो. हवा. ए. एन. माने आणि पो. कॉ. पी. पी. भोसले यांनी सहकार्य केले.






