राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कुणीच कायमचा शत्रू नसतो, असं म्हणतात. पण धाराशिवच्या मातीत हे वाक्य पुरतं खोटं ठरलंय. इथे दोन घराण्यांचा, नव्हे तर एकाच रक्ताचा संघर्ष गेल्या कित्येक दशकांपासून असा पेटलाय की, त्यांच्यासमोर चित्रपटातली पटकथाही फिकी वाटावी. ही गोष्ट आहे धाराशिवचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील हाडवैराची!
सख्खे चुलत भाऊ, पण आडनाव वेगळे? काय आहे ‘राज’कारण?
सुरुवात करूया या संघर्षाच्या मुळापासून. अनेकांना प्रश्न पडतो, ओमराजे आणि राणादादा हे दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत, मग दोघांची आडनावं वेगळी कशी? तर याचं उत्तर इतिहासात दडलंय.
ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे आजोबा संताजी राजेनिंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांचे आजोबा बाजीराव राजेनिंबाळकर हे दोघे सख्खे भाऊ! मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटणचे, गाव निंबकळ. पण नशिबाचा फेरा असा फिरला की, बाजीराव राजेनिंबाळकर यांना धाराशिव जिल्ह्यातील ‘तेर’च्या पाटील घराण्यात दत्तक देण्यात आले. दत्तक गेल्यामुळे बाजीरावांचे आडनाव बदलून ‘पाटील’ झाले, तर संताजीराजे ‘राजेनिंबाळकर’च राहिले.
दोन्ही भावांनी धाराशिव जिल्ह्यात बस्तान बसवलं. संताजीराजे गोवर्धनवाडीत तर बाजीराव पाटील तेरमध्ये स्थायिक झाले. दोन्ही गावात जेमतेम ५-६ किलोमीटरचं अंतर, पण पुढे या दोन घराण्यात जे अंतर पडलं, ते आजतागायत मिटलेलं नाही.
एका म्यानात दोन तलवारी आणि संघर्षाची ठिणगी
बाजीराव पाटलांचे सुपुत्र डॉ. पद्मसिंह पाटील राजकारणात आले. शरद पवारांचे ‘राईट हँड’ म्हणून ओळख निर्माण केली. राज्याचे गृहमंत्री झाले, तब्बल ४० वर्षे सत्तेचा सोपान चढत राहिले. दुसरीकडे संताजीराजेंचे सुपुत्र पवन उर्फ भूपालसिंह राजेनिंबाळकर हे डॉ. पाटलांची ताकद बनले. डॉक्टर साहेबांच्या मागे सावलीसारखे उभे राहिले, संघटनेची फळी सांभाळली आणि जिल्हा बँकेचे चेअरमनही झाले.
पण नियतीला हे सख्ख्य मान्य नव्हतं. २००२ साली जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचे भूत मानगुटीवर बसले आणि दोन भावांत वितुष्ट आले. पवनराजेंना अटक झाली, पण सुटून आल्यावर त्यांनी थेट डॉ. पद्मसिंह पाटलांनाच आव्हान दिलं. २००४ ची विधानसभा निवडणूक या दोन चुलत भावांमध्ये झाली. निकाल असा लागला की अख्खा महाराष्ट्र हादरला. डॉ. पद्मसिंह पाटील केवळ ४६५ मतांनी, ते ही पोस्टल मतांच्या जोरावर कसेबसे जिंकले. तिथेच डॉ. पाटलांच्या पायाखालची वाळू सरकली.
रक्ताचा सडा आणि सुडाचा प्रवास
पवनराजे भविष्यात डोईजड होतील, आपली सत्ता उध्वस्त करतील, या भीतीने राजकारणाने हिंस्र वळण घेतले. नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांची जून २००६ मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली. हे प्रकरण साध्या पोलिसांत थांबलं नाही, तर थेट सीबीआयकडे गेलं. तपासाची चक्रं अशी फिरली की, सत्तेच्या शिखरावर असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटलांना हत्येच्या आरोपाखाली जेलची हवा खावी लागली.
वाघाचा बछडा मैदानात!
वडीलांच्या हत्येनंतर ओमप्रकाश राजेनिंबाळकर नावाचं वादळ राजकारणात उतरलं. सुडाची आग आणि अन्यायाचा बदला घेण्यासाठी ओमराजेंनी २००९ च्या विधानसभेत डॉ. पाटलांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांना अस्मान दाखवलं.
तिथून सुरू झालेला हा विजयाचा वारू काही थांबला नाही. २०१९ च्या लोकसभेत पुन्हा राणा पाटलांचा पराभव केला आणि २०२४ च्या लोकसभेत तर राणा पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील यांना चारीमुंड्या चीत करत ओमराजेंनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं.
“तू कसला पाटील? तू तर दत्तक!” – शाब्दिक युद्ध
आता हा संघर्ष केवळ निवडणुकीपुरता उरला नाही, तर तो वैयक्तिक पातळीवर येऊन ठेपलाय. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत ओमराजेंनी राणा पाटलांच्या वर्मावर बोट ठेवलं.
ओमराजे कडाडले, “गेली ४५ वर्षे या पिता-पुत्राकडे सत्ता आहे, दोघे श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या नंबरवर आहेत, ७ कोटींची गाडी वापरतात, पण माझा धाराशिव जिल्हा मात्र देशाच्या मागास यादीत तिसऱ्या नंबरवर का?”
या टीकेने राणा पाटलांचा संयम सुटला. त्यांनी आपल्या जहागीरदार शैलीत उत्तर दिलं, “मी १२ वाड्या आणि १३ वे तेर गावचा पाटील आहे.”
हे ऐकताच ओमराजेंनी इतिहासाची पानं उघडली आणि असा ‘सिक्सर’ मारला की राणा पाटील निरुत्तर झाले. ओमराजे म्हणाले, “अरे कसला पाटील? इतिहास तपासा… तुमचे आजोबा दत्तक गेलेत. तुम्ही तर ‘दत्तक’ पाटील आहात!”
गोवर्धनवाडी आणि तेर या दोन गावांतलं हे हाडवैर आता केवळ राजकीय राहिलं नसून ते ‘अस्मितेची’ लढाई बनलं आहे. एका बाजूला वडिलांच्या हत्येचा बदला घेतलेला आक्रमक ओमराजे, तर दुसऱ्या बाजूला आपली उरलीसुरली राजकीय पत वाचवण्यासाठी धडपडणारे राणा पाटील. धाराशिवच्या कुरुक्षेत्रावर हे ‘महाभारत’ अजून किती काळ चालणार, हे फक्त काळच सांगेल!
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह






