कळंब: वाहने भाड्याने लावून देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची आणि वाहन मालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कळंबमध्ये उघडकीस आला आहे. आरोपींनी विश्वास संपादन करून २२ ट्रॅक्टर आणि २ जेसीबी असा एकूण १ कोटी २२ लाख रुपयांचा ऐवज लांबवल्याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी अजय संतोष चव्हाण (रा. सरताळे, ता. जावळी, जि. सातारा) आणि रफीक अब्दुल शेख (रा. दशमेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी कळंब न्यायालयासमोर ॲड. चोंदे यांच्या कार्यालयात बसून फिर्यादी आणि इतर वाहन मालकांचा विश्वास संपादन केला.
आरोपींनी वाहन मालकांना सुरुवातीला काही रक्कम डिपॉझिट म्हणून दिली. तसेच, ट्रॅक्टरला महिन्याला ३० हजार रुपये आणि जेसीबीला १ लाख रुपये भाडे देण्याचे कबूल करून तसे नोटरी करारही केले. या कराराच्या आधारे त्यांनी फिर्यादी बालाजी श्रीहरी मोरे (वय ४०, रा. दशमेगाव, ता. वाशी) आणि इतर शेतकऱ्यांचे मिळून एकूण २२ ट्रॅक्टर व २ जेसीबी वाहने त्यांच्या घरून नेली. मात्र, दि. २९ जानेवारी २०२५ पासून आजपर्यंत ही वाहने परत न करता किंवा ठरलेले भाडे न देता त्यांची फसवणूक केली.
गुन्हा दाखल:
याप्रकरणी बालाजी मोरे यांनी गुरुवारी (दि. ४ डिसेंबर) कळंब पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. यावरून अजय चव्हाण आणि रफीक शेख या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), २३६, २३७ आणि ३(५) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंब पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






