धाराशिव: धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी पक्षपातीपणा केल्याचा आणि ‘धाराशिव 2.0‘ या चॅनलने आचारसंहितेचा भंग केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ॲड. विशाल साखरे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि सायबर सेलकडे लेखी तक्रार दाखल केली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
निवडणूक अधिकाऱ्याच्या भूमिकेवर संशय
ॲड. विशाल साखरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी निवडणुकीच्या कामात पक्षपातीपणा केला आहे. दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ मधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान अधिकाऱ्यांनी संशयास्पद वर्तन केले. त्यांनी उमेदवारांना चुकीची माहिती दिली आणि प्रक्रिया सुरू असताना खाजगी केबिनमध्ये जाऊन फोनवर संभाषण केले. तसेच, या प्रक्रियेचे सीसीटीव्ही फुटेज (Video Recording) आणि कॉल रेकॉर्ड (CDR) मागूनही अद्याप दिले नसल्याचा आरोप साखरे यांनी केला आहे.
सोनाली माने यांचा अर्ज आणि तारखांचा घोळ
तक्रारीत नमूद केल्यानुसार, प्रभाग २ ‘अ’ मधील उमेदवार सौ. सोनाली स्वप्निल माने यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने अवैध ठरवण्यात आला. विशेष म्हणजे, या अर्जावर १९ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली असताना, निकाल मात्र मागील तारखेने म्हणजे १८ नोव्हेंबर रोजी दिल्याचे दाखवण्यात आले. हा प्रकार लोकशाहीला घातक असल्याचे साखरे यांनी म्हटले आहे.
फेक एक्झिट पोल आणि आचारसंहिता भंग
निवडणूक आचारसंहिता लागू असताना ‘धाराशिव 2.0’ या सोशल मीडिया चॅनलने १ डिसेंबर २०२५ रोजी एक फेक एक्झिट पोल प्रसिद्ध केला. यामध्ये भाजप उमेदवाराला प्रथम तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकावर दाखवून मतदारांची दिशाभूल करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गुन्हे दाखल करण्याची मागणी
मतदारांची फसवणूक करणे आणि अधिकाराचा दुरुपयोग केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी आणि ‘धाराशिव 2.0’ वाहिनीवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 171, 174, 175, 172, 318, 198, 199 तसेच लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 188 आणि 123 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी ॲड. विशाल साखरे यांनी केली आहे.






