तुळजापूर: तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरात भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तुळजापूर बायपासवर “महिला ट्रॅप” टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने वाहन थांबवायचे, प्रवाशाला पुलाखाली नेऊन लुटायचे आणि त्यानंतर महिलेमार्फत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी द्यायची, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते पंकज शहाणे यांनी जनजागृती केल्यानंतरही याच ठिकाणी दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
अशी आहे ५ जणांची टोळी आणि मोडस ऑपरेंडी
मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीत एकूण पाच सदस्य असून यात दोन महिलांचा समावेश आहे. ही टोळी तुळजापूर बायपास रोडवर दबा धरून बसते.
-
लिफ्टचा बहाणा: टोळीतील एक सदस्य रस्त्यावर उभा राहून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनाला हात दाखवून लिफ्ट मागतो.
-
पुलाखाली नेऊन मारहाण: वाहन थांबले की, आजूबाजूला लपलेले टोळीचे इतर सदस्य आणि महिला अचानक तिथे येतात. संबंधित प्रवाशाचे तोंड दाबून त्याला जबरदस्तीने रस्त्याखालील पुलाखाली किंवा आडोशाला नेले जाते.
-
चाकूचा धाक: तिथे प्रवाशाला बेदम मारहाण केली जाते. त्याच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत खिशातील मोबाईल, रोख रक्कम आणि अंगावरील दागिने/सोने काढून घेतले जाते.
ब्लॅकमेलिंगचा किळसवाणा प्रकार
केवळ लूटमार करून ही टोळी थांबत नाही, तर त्यानंतरचा प्रकार अधिक धक्कादायक आहे. लुटल्यानंतर टोळीतील एक महिला संबंधित प्रवाशाच्या अंगावर जाऊन लगट करते. त्याच वेळी टोळीतील इतर सदस्य त्याचा व्हिडीओ काढतात. “तू माझ्यावर बलात्कार केलास, आता हा व्हिडीओ पोलिसांना देऊन तुझ्यावर गुन्हा दाखल करतो,” अशी धमकी देऊन प्रवाशाला ब्लॅकमेल केले जाते. बदनामीच्या आणि पोलीस कारवाईच्या भीतीने पीडित व्यक्ती तक्रार करण्यास धजावत नाहीत.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
शहरात आणि बायपास परिसरात असे प्रकार वारंवार घडत आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी ओरड करूनही पोलीस प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने गुन्हे घडत असूनही पोलिसांना आरोपींचा तर्क लागत नाही किंवा त्यांच्यावर कारवाई होत नाही, याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पोलीस नक्की करतात तरी काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
जनजागृती आणि आवाहन
सामाजिक कार्यकर्ते पंकज शहाणे यांनी याआधीच बायपास परिसरात जाऊन नागरिकांना सतर्क केले होते. तरीही गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. नागरिकांनी बायपासवरून जाताना किंवा निर्जन ठिकाणी अनोळखी व्यक्तींना, विशेषतः महिलांना लिफ्ट देताना प्रचंड सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.






