धाराशिव: जिल्ह्यतील चोराखळी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साई कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून आणि त्यानंतर झालेल्या वादातून एका २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अश्रुबा अंकुश कांबळे (वय २५) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, येरमाळा पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अश्रुबा अंकुश कांबळे हा रुई (ता. ढोकी) येथील रहिवासी होता. त्याचे आणि धाराशिव येथील साई कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या एका महिलेचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
काल (सोमवारी) हे दोघेही शिखर शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून परत येत असताना प्रवासात अश्रुबा याला त्याच्या पत्नीचा फोन आला. पत्नीचा फोन आल्यानंतर अश्रुबा आणि त्याच्यासोबत असलेल्या प्रेयसीमध्ये कडाक्याचा वाद झाला. या वादातून रागाच्या भरात अश्रुबाने आत्महत्या करण्याची धमकी दिली. मात्र, प्रेयसीने या धमकीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर टोकाचे पाऊल उचलत अश्रुबा याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधित महिलेविरुद्ध आत्मसंस प्रवृत्त केल्याप्रकरणी (कलम ३०६ अन्वये) गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून, तिने तरुणाला त्रास दिला होता का? किंवा आत्महत्येमागे आणखी काही कारणे आहेत का? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली असून, अनैतिक संबंध आणि त्यातून उद्भवणाऱ्या कौटुंबिक कलहाचा हा आणखी एक बळी ठरला आहे.






