धाराशिव जिल्ह्यातील येडशी परिसरातील ‘साई कलाकेंद्रा’तील नर्तकीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आश्रुबा कांबळे या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केवळ दुर्दैवी नाही, तर संतापजनक आहे. ही आत्महत्या नसून एका व्यवस्थित रचलेल्या ‘हनी ट्रॅप’ आणि प्रशासकीय निष्क्रियतेचा हा बळी आहे. कला आणि संस्कृतीच्या नावाखाली महामार्गांवर नक्की चाललंय तरी काय, हा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
हे केवळ नैतिक स्खलन नाही, तर एक संघटित गुन्हेगारी आहे. आश्रुबा कांबळे या तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी केलेला तगादा इतका भयंकर होता की, त्याने घरातील सोने आणि आरडी मोडून पैसे दिले. तरीही नर्तकीची हाव संपली नाही. “मी जर कधी अचानक मेलो तर…” असे स्टेटस ठेवून तरुणाने जीव दिला, यावरून त्याला झालेला मानसिक त्रास किती टोकाचा असेल याची कल्पना येते. तीन महिन्यांपूर्वी बीडच्या एका माजी उपसरपंचाने अशाच त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनांवरून स्पष्ट होते की, कलाकेंद्रात जाणाऱ्या तरुणांना हेरून त्यांना लुटणारी एक टोळीच तिथे कार्यरत आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासनाने कळंब आणि चोराखळी परिसरातील जी कलाकेंद्रे बंद केल्याचा दावा केला होता, ती पुन्हा सुरू कशी झाली? “प्रशासनाने बंद केलेली केंद्रे सुरूच?” हा प्रश्न या व्यवस्थेच्या थोबाडीत मारणारा आहे. जर कालिका, महाकाली, गौरी आणि तुळजाभवानी यांसारखी केंद्रे सील केली असतील, तर तिथे पुन्हा ‘छमछम’ कोणाच्या आशीर्वादाने सुरू झाली? याचे उत्तर सरळ आहे – पोलिसांचे ‘अर्थ’पूर्ण संबंध!
धाराशिव जिल्ह्यातील ही कलाकेंद्रे पोलिसांसाठी ‘कुरण’ झाली आहेत काय? असा संशय येण्यास दाट वाव आहे. जेव्हा कायद्याचे रक्षकच डोळ्यांवर पट्टी बांधून आणि हात ओले करून गप्प बसतात, तेव्हाच असे अवैध धंदे फोफावतात. ‘कला केंद्र’ हे गोंडस नाव लावून आतमध्ये देहविक्रय, अश्लीलता आणि लुटमारीचे धंदे सुरू आहेत, हे काय पोलिसांना माहित नाही? एखादी घटना घडल्यावर गुन्हे दाखल होतात, काही दिवस कारवाईचे नाटक होते आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ सुरू होते.
आश्रुबा कांबळेचा बळी हा शेवटचा ठरावा. केवळ नर्तकीला अटक करून भागणार नाही, तर ज्या कलाकेंद्रात हा प्रकार घडला, त्या चालकांवर आणि या केंद्रांना अभय देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. अनेक संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या ‘मृत्यूच्या सापळ्यां’ना कायमचे टाळे ठोकण्याची हिंमत आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवायलाच हवी. अन्यथा, “पोलीसच गुंडांना पोसतात,” हा समाजाचा समज पक्का होईल.
तरुणांनो, तुम्हीही सावध व्हा! क्षणिक मोहापायी आयुष्य आणि संसार पणाला लावू नका. आणि प्रशासना, आता तरी जागे व्हा, आणखी किती आश्रुबांचे बळी गेल्यावर तुमचे डोळे उघडणार आहेत?
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह






