कळंब – चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कळंब शहरात घडली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्थेच्या बाथरूममध्ये ही घटना घडली असून, याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रद्धा मारुती माने (रा. सध्या पुनर्वसन सावरगाव, ता. कळंब, मूळ रा. देवधानोरा) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा माने यांचा विवाह आरोपी मारुती उत्रेश्वर माने यांच्याशी झाला होता. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी श्रद्धा यांच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. पती मारुती उत्रेश्वर माने, सासरे उत्रेश्वर माने आणि सासू भागीरथी उत्रेश्वर माने (सर्व रा. सध्या पुनर्वसन सावरगाव, ता. कळंब) यांनी संगनमत करून श्रद्धा यांना वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला.
या सततच्या जाचाला कंटाळून श्रद्धा यांनी दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास कळंब येथील राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्थेच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेप्रकरणी मयत श्रद्धा यांचे नातेवाईक बळीराम श्रीपती गोरे (वय ५४, रा. धनेगाव, ता. केज, जि. बीड) यांनी मंगळवारी (दि. ९ डिसेंबर) कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी पती मारुती माने, सासरे उत्रेश्वर माने आणि सासू भागीरथी माने यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.






