धाराशिव- धाराशिव जिल्ह्यात चोरांनी धुमाकूळ घातला असून, जिल्ह्यात घरफोडी, वाटमारी आणि चोरीच्या पाच वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात ईट (ता. भूम) येथे ५ लाखांची घरफोडी झाली असून, तुळजापूर आणि कळंब परिसरातही चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. या सर्व प्रकरणी मंगळवारी (दि. ९) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ईटमध्ये बंद घर फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास
भूम तालुक्यातील ईट येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ५ लाखांचा ऐवज लंपास केला. फिर्यादी श्रीमती सविता खंडू ढोपे (वय ५०, रा. ईट) यांचे घर २९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत बंद होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि घरातील ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापुरात वाटमारी; ५० हजारांचा ऐवज हिसकावला
तुळजापूर ते लातूर जाणाऱ्या बायपास रोडजवळ सिंदफळ फाटा येथे वाटमारीचा प्रकार घडला. माउली महादेव ताटे (वय ३४, रा. केमवाडी, ता. तुळजापूर) आणि त्यांचे सहकारी जात असताना तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांना रोडच्या कडेला नेले. तिथे त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख ३५ हजार रुपये असा एकूण ५० हजार रुपयांचा माल बळजबरीने हिसकावून पोबारा केला.
तुळजापूर बसस्थानकात ९० हजारांचे लॉकेट चोरीला
तुळजापूर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत चोरट्याने प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट लांबवले. निखील गौतम हावळे (वय २९, रा. बिलाल नगर, सोलापूर) हे ४ डिसेंबर रोजी सायंकाळी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट चोरले.
तहसील कार्यालयासमोरून दुचाकी गायब
कळंब येथील तहसील कार्यालसमोरील मोकळ्या जागेतून भरदिवसा दुचाकी चोरीला गेली. पोपट आप्पासाहेब लोमटे (वय ५६, रा. जवळा खु.) यांनी ३ डिसेंबर रोजी आपली हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच २५ झेड ७७६४) ही दुचाकी तहसील समोर लावली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. याप्रकरणी कळंब पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
दहिवडीतून तीन म्हशी चोरीला
तुळजापूर तालुक्यातील दहिवडी शिवारामधून शेतकऱ्याच्या तीन म्हशी चोरीला गेल्या आहेत. आनंद बबन गाटे (वय ४८, रा. दहिवडी) यांनी आपल्या शेतातील शेडच्या बाजूला ९० हजार रुपये किमतीच्या तीन म्हशी बांधल्या होत्या. २८ नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी त्या चोरून नेल्या.
या सर्व घटनांचा अधिक तपास संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.






