धाराशिव : उमरगा शहरातील काळे प्लॉट भागात सराईत गुंडांची मोठी दहशत असून, नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना धमकावले जात असल्याची गंभीर तक्रार धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
खासदार राजेनिंबाळकर यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, उमरगा शहरातील काळे प्लॉट भागात व्यंकट इराप्पा धोत्रे आणि आकाश इराप्पा धोत्रे या सराईत गुंडांची मोठी टोळी सक्रिय आहे. या टोळीत १०० ते १५० सदस्य असून, त्यांचा ‘आका’ विकास जाधव हा असल्याचे पत्रात म्हटले आहे. प्रभाग क्रमांक ४ आणि ५ मध्ये या टोळीची प्रचंड दहशत असून, नागरिक भीतीच्या छायेत आहेत.
“मी या भागाची हसीना पारकर…”
प्रभाग क्रमांक ४ आणि ५ ची निवडणूक २० डिसेंबर रोजी होत आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये टोळीचा म्होरक्या व्यंकट धोत्रे याची बहीण निवडणुकीसाठी उभी आहे. तिचा प्रचार करताना, “मी या भागाची हसीना पारकर आहे. मला मतदान न केल्यास तुमचे जगणे अवघड करीन,” अशा शब्दांत मतदारांना उघड धमक्या दिल्या जात असल्याचे खासदारांनी पत्रात नमूद केले आहे.
उमरगा पोलीस या गुंडांसमोर हतबल झाले असून ते कारवाई करत नसल्याचा आरोप खासदार राजेनिंबाळकर यांनी केला आहे. तसेच, २ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मतदानाच्या दिवशीही या टोळ्या सक्रिय होत्या आणि दहशतीखाली मतदान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
महत्वाच्या मागण्या:
१. प्रभाग क्र. ४ व ५ मधील मतदान केंद्रे ‘अतिसंवेदनशील’ म्हणून घोषित करावीत.
२. उर्दू शाळा, मुळज रोड येथील मतदान केंद्र दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे.
३. सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई करून निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पाडावी.
निवडणूक काळात उघडपणे “हसीना पारकर” चा उल्लेख करून धमकावल्याच्या प्रकारामुळे उमरग्यात खळबळ उडाली असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






