धाराशिव: धाराशिव नगर परिषद निवडणूक २०२५ च्या काळात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ‘धाराशिव २.०’ या सोशल मीडिया पेजवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही संबंधित आरोपीला अद्याप अटक न झाल्याने आणि तपास कार्यात दिरंगाई होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हा प्रवक्ते ॲड. विशाल साखरे यांनी आता थेट विशेष पोलीस महानिरीक्षक (छत्रपती संभाजीनगर) यांच्याकडे धाव घेतली आहे. सदर आरोपीला तात्काळ अटक करून त्याचे फोन, लॅपटॉप जप्त करावेत आणि बँक खात्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी साखरे यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान ‘धाराशिव २.०’ या चॅनेलने मतदान प्रक्रियेपूर्वीच मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आणि आचारसंहितेचा भंग केला, असा आरोप आहे. याप्रकरणी सायबर सेलने गुन्हा नोंद क्रमांक २४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६ (ए), २२३, ३३७, ३५३ आणि आयटी ॲक्ट कलम ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह
गुन्हा दाखल होऊनही पोलीस प्रशासनाने अद्याप संबंधित चॅनेल चालकाला अटक का केली नाही, असा सवाल ॲड. साखरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, तपासादरम्यान आरोपीचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस (मोबाईल, लॅपटॉप इ.) जप्त केले आहे का, याबाबतही साशंकता व्यक्त केली आहे.
कायदेशीर नोटीस देऊनही उत्तर नाही
या संदर्भात ॲड. साखरे यांनी ११ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक आणि सायबर सेलला कायदेशीर नोटीस (Legal Notice) पाठवली होती. मात्र, या नोटीसचे कोणतेही लेखी उत्तर पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ‘पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट’ आणि ‘ऑफिस अगेन्स्ट इलेक्शन’ अंतर्गत जी कलमे लावायला हवी होती, ती का लावली नाहीत, असा जाबही त्यांनी विचारला आहे.
प्रमुख मागण्या:
विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिलेल्या निवेदनात ॲड. विशाल साखरे यांनी खालील मागण्या केल्या आहेत:
-
तात्काळ अटक: ‘धाराशिव २.०’ च्या ॲडमिनला तात्काळ अटक करावी.
-
साहित्य जप्ती व तपास: आरोपीचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस (फोन, लॅपटॉप) जप्त करावेत आणि आर्थिक व्यवहारांची शहानिशा करण्यासाठी बँक खाती तपासावीत.
-
प्रक्षेपणावर बंदी: गुन्हा दाखल असूनही या पेजेसवर अपलोडवर चालू असल्याने, त्याच्यावर तातडीने बंदी आणावी.
-
वरिष्ठ स्तरावरून चौकशी: या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत.
पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






