तुळजापूर – तुळजापूर शहरात रस्त्याच्या कामावरून दोन राजकीय गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गोलाई चौकातील पंचायत समिती येथील रस्त्याच्या कामावरून हा वाद उफाळून आला. या राड्यामुळे तुळजापुरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील मुख्य वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूरचे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पिंटू गंगणे आणि महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवलेले उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यात हा वाद झाला. गोलाई चौकातील पंचायत समिती परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. पाहता पाहता या शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
या घटनेमुळे रस्त्यावर नागरिकांची आणि बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच गोंधळ घातल्याने धाराशिव आणि सोलापूरकडे जाणारा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला. यामुळे सलग दोन तास वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली होती, ज्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.
निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच तुळजापुरात दोन प्रमुख गटात हाणामारी झाल्याने शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही गटांमध्ये जोरदार भांडण आणि हाणामारी होऊनही अद्याप दोन्ही बाजूंकडून पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
- हा हाणामारीत तलवार, चाकू यांचा वापर
- काँग्रेसचे उमेदवार अमर मगर यांचे पुतणे कुलदीप मगर जखमी झाले असून, त्यांना सोलापूरला हलवण्यात आले आहे.
- तुळजापूर नगराध्यक्ष निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी आहे. त्याअगोदरचा हा राडा झाला आहे.
- पिटू गंगणे याच्या भाच्याकडून गोळीबार , गोळीबारात कुणीही जखमी नाही






