तुळजापूर – तुळजापूर शहरात रस्त्याच्या कामावरून दोन गटांत झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेला आता १८ तास उलटून गेले आहेत. तरीही अद्याप या प्रकरणी कोणावरही अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, त्यामुळे तुळजापूर पोलिसांच्या तपासावर आणि भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कुलदीप मगर मृत्यूशी झुंज देत आहेत.
तपासाची सद्यस्थिती: फॉरेन्सिक टीम आणि SRPF दाखल
काल (मंगळवारी) झालेल्या या थरारक घटनेनंतर आज पोलीस तपासाला वेग आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे पथक (Forensic Team) आणि राज्य राखीव दलाची (SRPF) तुकडी दाखल झाली आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे, तर खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
१८ तासात फक्त २ आरोपी जेरबंद
भररस्त्यात तलवारी, कोयते आणि बंदुकांचा वापर होऊनही पोलिसांनी गेल्या १८ तासांत केवळ दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. इतर मुख्य आरोपी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र, एवढी मोठी घटना घडूनही अद्याप ‘एफआयआर’ (FIR) का नोंदवला गेला नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
कुलदीप मगर यांची प्रकृती चिंताजनक
या हाणामारीत कोयत्याचे वार लागल्याने गंभीर जखमी झालेले काँग्रेस उमेदवार अमर मगर यांचे पुतणे कुलदीप मगर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह
एकीकडे शहरात दहशतीचे वातावरण असताना, दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यास होत असलेला विलंब संशयास्पद वाटत आहे. राजकीय दबावामुळे पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत का? असा प्रश्न आता सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.






