धाराशिव: तुळजापूरसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री १६ डिसेंबर रोजी भरदिवसा काही गुंडांनी चाकू आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत, संबंधित गुंडांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज (१७ डिसेंबर २०२५) महाविकास आघाडी धाराशिवच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मंगळवारी (दि. १६) तुळजापूर शहरात काही समाजकंटकांनी भरदिवसा हैदोस घालत नागरिकांना चाकू आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच यावेळी गोळीबार झाल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या गुंडांकडून शहरात ड्रग्ज, अवैध दारू आणि इतर बेकायदेशीर धंदे सुरू असून, त्यांनी शहरात एक प्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक तुळजापुरात येतात. मात्र, अशा गुंडगिरीच्या प्रकारांमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पवित्र नगरीची बदनामी होत असल्याची खंत महाविकास आघाडीने व्यक्त केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस (आय) आघाडीच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. गुंडगिरी करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक व कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
हे निवेदन देताना शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष सोमनाथ चंद्रकांत गुरव, काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, प्रशांत नानासाहेब पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.






