धाराशिव: शहरालगत असलेल्या जहागीरदारवाडी तांडा येथे शोष खड्ड्याच्या जागेवरून दोन गटात वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची घटना घडली आहे. या वादात एका कुटुंबाने गैरकायद्याची मंडळी जमवून काका-पुतण्याला लाथाबुक्क्यांनी आणि कोयत्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. १७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
जहागीरदारवाडी तांडा (ता. जि. धाराशिव) येथे राहणारे फिर्यादी गुलाब उत्तरेश्वर जाधव (वय ४२) आणि आरोपी यांच्यात शोष खड्ड्याच्या जागेवरून वाद झाला. या वादाचा राग मनात धरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली. त्यांनी गुलाब जाधव यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच, आरोपींनी हातातील कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले.
वाद सोडवण्यासाठी आलेल्या गुलाब जाधव यांचा पुतण्या पृथ्वीराज सुनील जाधव यालाही आरोपींनी मारहाण करून जखमी केले. तसेच यावेळी आरोपींनी फिर्यादीस जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
आरोपींची नावे:
या प्रकरणी खालील ६ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१. शिवाजी लिंबा जाधव २. मोतीराम शिवाजी जाधव ३. कविता उज्ज्वल जाधव ४. यश उज्ज्वल जाधव ५. वैष्णवी उज्ज्वल जाधव ६. उज्ज्वल जाधव (सर्व रा. जहागीरदारवाडी तांडा, ता. जि. धाराशिव)
पोलिस कारवाई:
गुलाब जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२)(३) आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.






