मुरुम: महिला बचत गटाचे पैसे गोळा करून परतणाऱ्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला दुचाकी आडवी लावून, कातडी हंटरने बेदम मारहाण करत २ लाख ८० हजार रुपयांची रोकड लुटल्याची खळबळजनक घटना मुरुम-येणेगूर रोडवर घडली. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित जयवंत देडे (वय २५, रा. पानवाडी, ता. जि. धाराशिव) असे लुटल्या गेलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. रोहित हे मुरुम येथील भारत फायनान्स कंपनीत काम करतात.
घटनेचा सविस्तर तपशील असा की, रोहित देडे हे दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी महिला बचत गटाचे कलेक्शनचे काम संपवून पैसे घेऊन येणेगूर येथे येत होते. रात्री ९.३० च्या सुमारास ते साखर कारखान्याच्या पुढे असलेल्या डाळ मिल समोर आले असता, दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी आडवी लावून त्यांना थांबवले.
चोरट्यांनी रोहित यांना अडवून कातडी हंटरने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्याकडील जमा झालेली २ लाख ८० हजार रुपयांची रोकड, दोन बायोमॅट्रिक मशीन आणि दोन टॅब असा ऐवज बळजबरीने हिसकावून पोबारा केला.
या घटनेनंतर जखमी रोहित देडे यांनी गुरुवारी (दि. १८) दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून मुरुम पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६) (दरोडा) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






