सोलापूर : “तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीची तुम्ही पाठराखण का करत आहात? जर याच आरोपीने आणलेले ड्रग्ज तुमच्या मुलाने घेतले असते आणि त्याला त्याचे व्यसन लागले असते, तर तुम्ही ते सहन केले असते का? कोणताही बाप हे सहन करेल का?” असा संतप्त सवाल उपस्थित करत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
तुळजापूर शहरात मंगळवारी पिटू गंगणे यांच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेले कुलदीप मगर सध्या सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची विचारपूस केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खा. निंबाळकर यांनी आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेतला.
ड्रग्ज माफियांची पाठराखण कशासाठी?
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधताना खा. ओमराजे म्हणाले, “तुम्ही विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करता आणि तुळजापूरची बदनामी होत असल्याचे सांगता. मात्र, दुसरीकडे ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पिटू गंगणे याची पाठराखण करता, ही दुटप्पी भूमिका का? पिटू गंगणे तुम्हाला ब्लॅकमेल करत आहे का? तुमचे काही तिथे अडकले आहे का?” अशा शब्दांत त्यांनी पाटलांना धारेवर धरले.
दारू पार्टीचा फोटो दाखवत विचारला जाब


यावेळी खा. ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मोबाईलमधील एक फोटो माध्यमांना दाखवला. हा फोटो निवडणुकीनंतर एका शेतात झालेल्या दारू पार्टीचा असल्याचे त्यांनी सांगितले. “अशा दारूच्या पार्ट्यांचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होतात, तेव्हा तुळजापूरची बदनामी होत नाही का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “तुम्ही चुकीचे कृत्य करायचे आणि आम्ही त्याबद्दल विचारले की उलट आम्हालाच म्हणायचे की तुळजापूरची बदनामी का करताय? हे खपवून घेतले जाणार नाही.” तुळजापूरमध्ये सुरू असलेल्या प्रकारांवरून आणि कुलदीप मगर यांच्यावरील हल्ल्यावरून खा. निंबाळकर यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले.






