नवी मुंबई: स्वतः पोलीस असल्याचे सांगून एका विद्यार्थिनीला धमकावणाऱ्या आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला बेलापूर सत्र न्यायालयाने १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सागर धुळप असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्रेमसंबंधाची माहिती घरच्यांना देण्याची धमकी देऊन त्याने पीडितेचे शोषण केले होते. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत न्यायालयाने त्याला कठोर शिक्षा ठोठावली आहे.
नेमकी घटना काय?
आरोपी सागर धुळप याने वाशी सेक्टर १५ परिसरात एका विद्यार्थिनीला अडवले होते. आपण पोलीस असल्याचे खोटे सांगून त्याने तिच्यावर दबाव टाकला. “तुझ्या प्रेमसंबंधाची माहिती तुझ्या घरच्यांना सांगेन,” अशी भीती दाखवून त्याने सुरुवातीला ३० हजार रुपयांची मागणी केली. पीडित तरुणीने पैसे नसल्याचे सांगताच, सागरने तिला धमकावून बळजबरीने तुर्भे येथील एका लॉजवर नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.
इतकेच नव्हे तर, या घटनेनंतरही तो तिला ब्लॅकमेल करू लागला. पैशांची आणि शरीरसुखाची वारंवार मागणी करून त्याने तरुणीला त्रस्त केले होते. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून पीडितेने हिंमत एकवटत घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.
न्यायालयाचा निकाल
वाशी पोलिसांनी सागर धुळप विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. या खटल्याची अंतिम सुनावणी सोमवारी बेलापूर सत्र न्यायालयात पार पडली. यावेळी न्यायाधीश पी. एन. साने यांनी सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरत सागर धुळप याला दोषी ठरवले. त्याला १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
तपास आणि युक्तिवाद
-
तपास अधिकारी: या गुन्ह्याचा तपास वाशी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे (सध्या पोलीस निरीक्षक, धाराशिव ग्रामीण) यांनी केला.
-
सरकारी वकील: ॲड. योगेश पाटील यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला.
-
पैरवी अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक नारायण चव्हाण आणि पोलीस नाईक रमेश बिरारी यांनी न्यायालयीन कामात महत्त्वाची भूमिका बजावली.






