धाराशिव: जिल्ह्यातील आठ नगर परिषदांच्या निवडणूक निकालात महाविकास आघाडीच्या, विशेषतः शिवसेना ठाकरे गटाच्या पदरी निराशा पडली आहे. या निकालावरून आता भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झडली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे ‘ओपन चॅलेंज’चे राजकारण सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे.
मल्हार पाटलांने खासदार-आमदारांना डिवचले
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी या निवडणुकीत प्रथमच सक्रिय सहभाग नोंदवत निवडणुकीची सूत्रे हाती घेतली होती. निकालात भाजपला मिळालेल्या यशानंतर मल्हार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना थेट लक्ष्य केले आहे.
मल्हार पाटील यांनी ओपन चॅलेंज देताना म्हटले आहे की,
“मी या दोघांना (खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील) ओपन चॅलेंज देतो की, त्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा अध्यक्ष निवडून आणून दाखवावा.”त्यांनी निवडून आणून दाखवला तर मी नाव बदलतो. तकंच नाही, तर मशालीच्या चिन्हाची खिल्ली उडवत त्याला ‘आईस्क्रीम कोन’ म्हटले आहे.
त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
तानाजी जाधवरांचे प्रतिआव्हान: ‘बघू तुझ्यात धमक…’
मल्हार पाटील यांच्या या आव्हानाला ठाकरे गटानेही आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी मल्हार पाटील यांना फेसबुक पोस्टद्वारे प्रतिआव्हान दिले आहे.
जाधवर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,
“तुला पण ओपन चॅलेंज… तू स्वतः जिल्हा परिषदेला उभा राहून दाखव! बघू तुझ्यात किती धमक आहे.”
जाधवर यांच्या या सडेतोड उत्तरामुळे हा कलगीतुरा अधिकच रंगला आहे.
‘मल्हार पर्वा’चा उदय?
एकीकडे हा राजकीय संघर्ष सुरू असताना, दुसरीकडे भाजप गोटात मल्हार पाटील यांचे नेतृत्व अधोरेखित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. धाराशिवमध्ये नगराध्यक्ष निवडणुकीत विजयी झालेल्या नेहा काकडे यांचे पती राहुल काकडे यांनी सोशल मीडियावर मल्हार पाटील यांचे कौतुक केले आहे. काकडे यांनी “उदय नव्या पर्वाचा, मल्हार पर्व” अशा शब्दांत मल्हार पाटील यांचा उदोउदो केला आहे.
मल्हार पाटील यांनी प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरून नियोजनाची धुरा सांभाळली होती. नगर पालिका निकालांनी त्यांना आत्मविश्वास दिला असला तरी, तानाजी जाधवर यांच्या प्रतिआव्हानामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही ‘पाटील विरुद्ध ठाकरे गट’ अशी अत्यंत चुरशीची होणार, हे आता स्पष्ट झाले आहे.






