कळंब: धाराशिव जिल्ह्यातील कळंब-लातूर महामार्गावर रविवारी ‘हिट अँड रन’चा (Hit and Run) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात वाहनाने रस्त्यावरून चाललेल्या ७ ऊसतोड मजुरांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात ४ मजुरांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जखमी मजूर कळंब तालुक्यातील मंगरूळ गावचे रहिवासी असून ते आदिवासी पारधी समाजाचे आहेत. दिवसभर ऊस तोडीचे कष्टाचे काम संपवून हे मजूर आठवडी बाजारासाठी किंवा खरेदीसाठी कळंबकडे येत होते. त्याच वेळी कळंब-लातूर रस्त्यावर एका भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की मजुरांना उडवल्यानंतर वाहन चालक माणुसकी विसरून घटनास्थळावरून वेगाने पसार झाला. या घटनेत एकूण ७ मजूर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना तातडीने कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यातील चौघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात संदर्भीत करण्यात आले आहे.
लातूरच्या चालकावर संशय:
अपघातग्रस्त वाहनावर लातूर जिल्ह्याचे पासिंग (Passing Number) असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित वाहन चालक हा लातूर जिल्ह्यातीलच असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाईकांनी कळंब शासकीय रुग्णालयात धाव घेतली. आपल्या आप्तस्वकीयांच्या अवस्थेमुळे नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. पोलीस सध्या पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेत आहेत.






