नळदुर्ग: तुळजापूर तालुक्यातील वडाचा तांडा येथे पवनचक्कीच्या पोलच्या पैशाच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना: लोखंडी सळईने मारहाण
पहिल्या घटनेत जयराम सोमा चव्हाण (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, २० डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास वडाचा तांडा येथे आरोपी शिवराम सोमा चव्हाण, मायाबाई शिवराम चव्हाण, अमति शिवराम चव्हाण आणि विशाल शिवराम चव्हाण यांनी संगनमत करून पवनचक्कीच्या पोलच्या पैशाच्या कारणावरून वाद घातला. यावेळी आरोपींनी जयराम यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी नळदुर्ग पोलिसांत भा.न्या.सं. कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना: लोखंडी पाईपने हल्ला आणि जीवे मारण्याची धमकी
दुसऱ्या घटनेत शिवराम सोमा चव्हाण (वय ५६) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:३० ते १०:०० च्या दरम्यान आरोपी जयराम सोमा चव्हाण, ललिता जयराम चव्हाण, संतोष जयराम चव्हाण आणि राहुल जयराम चव्हाण यांनी शिवराम चव्हाण आणि त्यांच्या पत्नी मायाबाई यांना मारहाण केली. पवनचक्कीच्या पैशाच्या वादातून आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण करून त्यांना जखमी केले. तसेच, घराचा दरवाजा तोडून २,००० रुपयांचे नुकसान केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दोन्ही बाजूंच्या तक्रारींनंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली असून पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.






