धाराशिव: धाराशिव नगर पालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या स्पष्ट बहुमतानंतर शहरातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. रविवारी भाजपच्या नेहा काकडे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आणि भाजपने ४१ पैकी २२ जागा जिंकत पालिकेवर वर्चस्व सिद्ध केले. या विजयानंतर लगेचच गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या शहरातील रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती उठवण्यात आल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. मात्र, यावरून आता शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली असून, प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी भाजपवर ‘टक्केवारी’साठी कामे अडवल्याचा गंभीर आरोप केला आहे.
आमदार राणा पाटील यांची भूमिका: ‘विरोधकांचे षडयंत्र निष्फळ’
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली की, नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ११७ कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील ५९ रस्ते आणि नाल्यांची कामे आता युद्धपातळीवर सुरू होणार आहेत.
पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी या कामांचे कार्यारंभ आदेश निघाले होते आणि २८ ऑक्टोबरला कामाला सुरुवातही झाली होती. मात्र, काही तक्रारींच्या आधारे पालकमंत्र्यांच्या पत्रानुसार या कामांना स्थगिती देण्यात आली होती. ४ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही प्रक्रिया पारदर्शक असल्याचे सिद्ध झाले आणि स्थगिती उठवण्यात आली. परंतु, आचारसंहितेमुळे कामाला सुरुवात करता आली नाही. आता निवडणूक निकालानंतर लगेचच या कामांचा मार्ग मोकळा झाला असून, विरोधकांनी आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्यासाठी जाणीवपूर्वक निर्माण केलेले अडथळे दूर झाले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे गटाचा प्रतिहल्ला: ‘स्थगिती देणारे आणि उठवणारे सरकार एकच!’
दुसरीकडे, या घडामोडींवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ही स्थगिती केवळ ‘गुत्तेदारी आणि टक्केवारी‘साठीच आणली होती, असा आरोप केला आहे.
जाधवर म्हणाले, “स्थगिती देणारे हेच सरकार होते आणि आता स्थगिती उठवणारेही हेच सरकार आहे. मग खापर मात्र विरोधकांच्या नावाने का फोडले जात आहे? तुमचा नगराध्यक्ष निवडून आल्यावरच बरोबर स्थगिती कशी उठते? याचा अर्थ स्पष्ट आहे की, केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि स्वतःचे आर्थिक हित साधण्यासाठी हे कारस्थान रचले गेले होते.”
नेमका वाद काय?
शहरातील खराब रस्ते हा धाराशिवमधील कळीचा मुद्दा ठरला आहे. आता पालिकेत भाजपची सत्ता आली असून, रस्त्यांच्या कामांवरील स्थगितीही उठली आहे. त्यामुळे उद्यापासून कामे सुरू होणार असली तरी, या कामांचे श्रेय आणि त्यामागील राजकारण यावरून शहरातील वातावरण येत्या काळात आणखी तापण्याची चिन्हे आहेत.








