तुळजापूर: तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरात जुन्या बस स्थानक परिसरात भर सायंकाळी गुंडांनी धुमाकूळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. वाईन शॉपवर येऊन दुकानमालकाकडे दरमहा १० हजार रुपये हप्त्याची मागणी करत, पैसे न दिल्यास मुलाचे अपहरण करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील जुन्या बस स्थानकाजवळील चेतन वाईन शॉप येथे घडली. याप्रकरणी अमर श्रीराम नाईक (वय ५२, रा. पंढरपूरकल गल्ली, तुळजापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
नेमकी घटना काय?
अमर नाईक हे आपल्या दुकानावर असताना आरोपी प्रशांत कांबळे, बालाजी जाधव आणि बाबा शेख (सर्व रा. तुळजापूर) तिथे आले. त्यांनी नाईक आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी दुकानातून बळजबरीने ३,१०० रुपयांचा माल नेला. तसेच जाताना, “दर महिना १०,००० रुपये हप्ता दे, नाहीतर तुझ्या मुलाला किडनॅप करू,” अशी गंभीर धमकी दिली.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापारी अमर नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८ (३) (खंडणी/बळजबरीने चोरी), ३५२ (शांतता भंग करण्यासाठी अपमान करणे) आणि ३ (५) (संगनमत) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
सदर तक्रार खोटी असून, आम्ही कसलीही शिवीगाळ किंवा धमकी दिलेली नाही, तसेच आम्ही त्याच दिवशी पैसे दिले आहेत. पोलिसांनी जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केला आहे, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत – प्रशांत कांबळे






