धाराशिव – सर्वधर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सुफी संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी (रहे.) यांच्या दर्ग्याचा वार्षिक उर्स महोत्सव २ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असलेला हा उत्सव तब्बल ७२१ वर्षांपासून अविरतपणे साजरा केला जात आहे.
धाराशिव शहराच्या दक्षिण भागात सुफी संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी यांचा भव्य दर्गा आहे. या यात्रेत दरवर्षी सर्व धर्मांचे लोक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. उर्स दरम्यान संदल मिरवणूक, कव्वाली, मुशायरा, आणि कुस्ती अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते.
उर्स कार्यक्रमांचे सविस्तर वेळापत्रक:
यंदाच्या उर्ससाठी महाराष्ट्र राज्य व महामंडळाच्या वतीने जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांमार्फत खालीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:
-
२ जानेवारी (शुक्रवार): पंखा मिरवणूक (उर्सचा प्रारंभ)
-
३ जानेवारी (शनिवार): सेहरा मिरवणूक
-
४ जानेवारी (रविवार): गुसल पाणी मिरवणूक कार्यक्रम
-
५ जानेवारी (सोमवार): मुख्य संदल मिरवणूक व महफिल-ए-समा
-
६ जानेवारी (मंगळवार): चिरागा कार्यक्रम, कव्वाली व महफिल-ए-समा
-
७ जानेवारी (बुधवार): कव्वाली कार्यक्रम व जियारत
-
८ जानेवारी (गुरुवार): वाजबयान कार्यक्रम व नाते शरीफ
-
९ जानेवारी (शुक्रवार): मुशायरा
-
१० जानेवारी (शनिवार): गझल कार्यक्रम
-
११ जानेवारी (रविवार): कुस्ती, आतषबाजी व उर्स समाप्ती.
हा ऐतिहासिक सोहळा शांततापूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती धाराशिवचे जिल्हा वक्फ अधिकारी यांनी दिली आहे. भाविकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.




