तुळजापूर: आई तुळजाभवानीच्या चरणी भल्याभल्यांना नतमस्तक व्हावं लागतं, तिथे कोणाचाही बडेजाव चालत नाही. पण एका महाशयांनी चक्क देवीच्या दारातच स्वतःचा खोटा रुबाब दाखवण्याचा प्रयत्न केला. स्वतःला ‘आय.ए.एस. अधिकारी’ (IAS Officer) भासवून व्हीआयपी (VIP) दर्शनाचा घाट घालणाऱ्या एका तोतयाला मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
नेमकं काय घडलं?
तुळजाभवानी मंदिरात सध्या भाविकांची गर्दी असते. अशातच निखिल मदनलाल परमेश्वरी नावाच्या एका व्यक्तीने आपल्या कुटुंबियांसह थेट व्हीआयपी दर्शनासाठी एन्ट्री मारली. नुसती एन्ट्रीच नाही, तर या पठ्ठ्याने आपण बडे अधिकारी असल्याचा दावा करत चक्क लोकसेवा आयोगाचे (UPSC) बनावट ओळखपत्र कर्मचाऱ्यांच्या तोंडावर फेकले.
पितळ उघडं पडलं अन…
‘चोरी नको, पण शिनाजोरी’ असाच काहीसा हा प्रकार होता. मात्र, मंदिर संस्थांनचे कर्मचारी खऱ्या आणि खोट्या अधिकाऱ्यांमधला फरक ओळखण्यात वाकबगार निघाले. त्यांनी ओळखपत्राची कसून तपासणी केली आणि या बनावट साहेबाचं ‘बिंग’ फुटलं. ज्या ओळखपत्राच्या जोरावर निखिल परमेश्वरी व्हीआयपी सुविधा लाटू पाहत होता, ते चक्क बोगस निघालं.
थेट पोलिसांचा ‘पाहुणचार’
व्हीआयपी दर्शनासाठी आलेले हे बनावट साहेब आता थेट पोलीस कोठडीची हवा खाणार आहेत. मंदिर प्रशासनाने तत्परता दाखवत या तोतयाला तुळजापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
भक्तीच्या ठिकाणी शक्तीचे आणि पदाचे प्रदर्शन करणाऱ्यांना ही घटना म्हणजे एक चपराकच आहे. देवीच्या दारात सर्व समान असतात, तिथे ‘शॉर्टकट’ मारणाऱ्यांचे काय हाल होतात, हे या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.






