धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील नगर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी विजयानंतर शहरात लावलेल्या “बाळ नाद करायचा नाही” या आशयाच्या होर्डिंग्जमुळे सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
निवडणुकीत भाजपची सरशी
जिल्ह्यातील आठ नगर पालिकांच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) अपेक्षित यश मिळवू शकली नाही. दुसरीकडे, भाजपने जोरदार मुसंडी मारत धाराशिव, तुळजापूर आणि नळदुर्ग नगर पालिकेवर आपला झेंडा फडकावला आहे. विशेषतः भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या यशानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
होर्डिंग्जवरून डिवचले
विजयाच्या आनंदोत्सवात भाजप कार्यकर्त्यांनी शहरात काही ठिकाणी वादग्रस्त होर्डिंग्ज लावले आहेत. या होर्डिंग्जवर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राणा पाटील यांचे फोटो असून त्यावर “बाळ नाद करायचा नाही” असा मजकूर ठळकपणे छापला आहे. हा मजकूर थेट शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून असल्याचे बोलले जात असून, त्यांना पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
ठाकरे गटाचे सणसणीत प्रत्युत्तर
भाजपच्या या पोस्टरबाजीला शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जशास तसे उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला असून, ठाकरे गटाने भाजपला थेट आव्हान दिले आहे.
“हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, म्हणजे नाद कुणाचा खुळा आहे हे कळेल,” अशा शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, “लोकसभेला मिळालेले लीड आठवून बघा, एका पराभवाने कुणी खचत नसते,” अशा आशयाच्या कमेंट्स करत शिवसैनिकांनी आमदार राणा पाटील गटाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
या पोस्टर वॉरमुळे धाराशिवमधील राजकारण पुन्हा एकदा पेटले असून, आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.






